
Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या पहिल्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानी संघाने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पाकिस्तानने अवघ्या 193 धावांत गुंडाळले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने अवघ्या 39.3 षटकांत 3 गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानचा पुढचा सामना 10 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध होणार आहे.
दरम्यान, 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघासाठी सलामीवीर इमाम-उल-हकने अप्रतिम कामगिरी केली. इमामने या सामन्यात 84 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.
त्याला मोहम्मद रिझवानची चांगली साथ मिळाली. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 63 धावा केल्या. तर फखर जमानने 20 आणि कर्णधार बाबर आझमने 17 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
यासह पाकिस्तान संघाने आशिया चषकामध्ये एक मोठा विक्रम केला. आशिया चषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत पाकिस्तान संघ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानने (Pakistan) बांगलादेशविरुद्ध आशिया चषकात 14 सामन्यांमध्ये 13वा विजय मिळवला आहे.
13- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (14 सामने)*
12 - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (14)
11 - भारत विरुद्ध बांगलादेश (12)
10 - श्रीलंका विरुद्ध भारत (19)
10 - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (14)
दुसरीकडे, हारिस रौफ आणि नसीम शाह यांच्या झंझावाती गोलंदाजीमुळे पाकिस्तानने बांगलादेशचा डाव 193 धावांत गुंडाळला.
पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने 4, नसीम शाहने 3 आणि शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमदने 1-1 बळी घेतले.
मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन यांच्याशिवाय बांगलादेशच्या (Bangladesh) एकाही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पॉवर प्लेमध्येच संघाने 47 धावांत आपले पहिले 4 विकेट गमावले होते, तर 30 ते 39 षटकांत संघाने 47 धावा करुन सहा विकेट गमावल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.