पाळोळ्याचा केविन कोलकात्यात रमला

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

ईस्ट बंगालकडून पुन्हा खेळणारबंगालमधील फुटबॉलमध्ये आठवा मोसम

पणजी 

काणकोण तालुक्यातील पाळोळे समुद्रकिनारी बालपणी फुटबॉल खेळलेला केविन लोबो कोलकात्यातील फुटबॉलमध्ये चांगलाच रमला आहे. भारतीय फुटबॉल पंढरी मानली जाणाऱ्या नगरीतील ईस्ट बंगाल संघाकडून गोव्याचा ३२ वर्षीय मध्यरक्षक आणखी एक मोसम खेळेल.

केविनचा यंदा कोलकात्यातील फुटबॉलमध्ये आठवा मोसम असेल. त्याने ईस्ट बंगालशी २०२१-२२ पर्यंत करार केला असून येत्या १ ऑगस्टपासून तो ईस्ट बंगाल संघात रुजू होईल. कोलकात्यातील वास्तव्यात केविन दोन वेळा आयएसएल विजेत्या एटीके संघाकडून खेळला असून बाकी काळ त्याने ईस्ट बंगालचे प्रतिनिधित्व केले. २०१२ साली तो सर्वप्रथम ईस्ट बंगालच्या जर्सीत खेळला. त्यावेळी या संघाने फेडरेशन कप जिंकला होता. २०१४ साली तो संघात असताना एटीके संघाने आयएसएल स्पर्धा जिंकली होती.

आक्रमक-मध्यरक्षक असलेला केविन २०१५ मध्ये केरळा ब्लास्टर्स संघाकडून लोनवर आयएसएल स्पर्धेत खेळला होता. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत त्याने ईस्ट बंगालचे शंभरहून जास्त सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. केविनने २०१८ मध्ये ईस्ट बंगाल संघाला सोडचिठ्ठी दिली. तो कोलकात्याच्याच एटीके संघात दाखल झाला. तीन वेळा आयएसएल स्पर्धा जिंकलेल्या एटीके संघात त्याला मर्यादित संधी मिळाली. त्यामुळे त्याला आय-लीग स्पर्धेतील संघाकडून लोनवर खेळावे लागले. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सचे २०१८-१९ मोसमात प्रतिनिधित्व केल्यानंतर केविन २०१९-२० मोसमात पंजाब एफसी संघाकडून १५ सामने खेळला.

केविनला २०१६ साली गुडघ्याची गंभीर दुखापत झालीत्यातून सावरत त्याने कारकीर्द पुढे नेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने २०१५ पासून भारताचे ८ सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

 दररोज काणकोण-पणजी प्रवास!

केविन आणि त्याला भाऊ टेरेन्स हे दोघेही फुटबॉलपटू आहेत. वेळसाव पाळे क्लबचे प्रतिनिधित्व केल्यानंतर केविन २००७ साली स्पोर्टिंग क्लब द गोवा संघात दाखल झाला. त्यासाठी लोबो बंधूंना काणकोणहून दररोज सकाळी लवकर उठून सत्तरहून जास्त किलोमीटर प्रवास करून पणजीला यावे लागत असे. स्पोर्टिंगकडून तीन मोसम खेळल्यानंतर केविनने धेंपो स्पोर्टस क्लब व मुंबई एफसीचेही प्रतिनिधित्व केले. ईस्ट बंगालसारख्या बलाढ्य संघाने विचारणा केल्यानंतरकेविन नकार देऊ शकला नाही. त्यानंतर त्याचे फुटबॉल कोलकातानगरीतच बहरले.

 

संबंधित बातम्या