पणजी फुटबॉलर्स साळगावकरला धक्का; जॉयसनच्या गोलमुळे सामन्यात एका गोलने निसटता विजय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

सामन्यातील एक मात्र निर्णायक गोल 81व्या मिनिटास जॉयसन गांवकार याने नोंदविला.

पणजी : पणजी फुटबॉलर्सने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी सनसनाटी निकाल नोंदविताना अग्रस्थानावरील साळगावकर एफसीला 1-0 फरकाने पराभवाचा धक्का दिला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यातील एकमात्र निर्णायक गोल 81व्या मिनिटास जॉयसन गांवकार याने नोंदविला. सिरील डायस याच्या शानदार क्रॉसपासवर जॉयसनने भेदक हेडिंग साधत साळगावकर एफसीच्या गोलरक्षकाला चकविले. पणजी फुटबॉलर्सचा हा आठ लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 10 गुण झाले आहेत. साळगावकर एफसीचा हा आठ लढतीतील पहिला पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे 17 गुण कायम राहिले. (Panaji footballers push Salgaonkar Joysons goal gave the match a one goal victory)

Goa Professional League: पेनल्टी फटका दवडल्याने स्पोर्टिंगचे नुकसान

सामन्यात दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. साळगाकर एफसीच्या अंतुश मोनिझ याने सामन्याच्या सुरवातीस पणजी फुटबॉलर्सवर आक्रमण केले होते, पण गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने प्रयत्न फोल ठरविला. त्यापूर्वी पणजी फुटबॉलर्सच्या कृष्णा गावस याला साळगावकरच्या प्रथमेश सातार्डेकर याने पाडल्यानंतर पणजीच्या संघाने पेनल्टी फटक्याचे अपिल केले होते, पण रेफरीने ते मान्य केले नाहीत. सामन्याच्या पूर्वार्धात पणजी फुटबॉलर्सला गोल करण्याची आणखी एक संधी होती, परंतु लॉईड कार्दोझ साळगावकरचा गोलरक्षक जेसन डिमेलो याला चकवू शकला नाही. 

उत्तरार्धात साळगावकर एफसीला आघाडीची चांगली संधी होती, परंतु बदली खेळाडू स्टीफन सतरकर अगदी जवळून फटका मारताना अचूकतेत चुकला. 68व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सच्या जॉयसन गांवकार याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. पणजी फुटबॉलर्सच्या लॉईड कार्दोझ याने साळगावकर एफसीच्या दोघा बचावपटूंना चकवा देत मारलेला फटका गोलरक्षकाने रोखला होता, त्यानंतर रिबाऊंडवर हेडिंग गोल साधताना जॉयसन ऑफसाईड ठरला. त्यानंतर गोल करण्याचे आणखी दोन प्रयत्न चुकल्यानंतर जॉयसनने पणजी फुटबॉलर्सला आघाडी मिळवून दिली. 

संबंधित बातम्या