पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

गोमंतक ऑनलाईन टीम
बुधवार, 9 डिसेंबर 2020

आज दुपारी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने वयाच्या 36 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.

नवी दिल्ली-  सचिन तेंडूलकरनंतर सर्वात कमी वयात भारतीय संघात दाखल झालेला क्रिकेटर  पार्थिव पटेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज दुपारी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने वयाच्या 36 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे.

याबाबत बोलताना तो म्हणाला, 'मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करत आहे.  18 वर्षांच्या क्रिकेट प्रवासावर मी आज पडदा टाकतो आहे. अनेकांनी दाखवलेल्या कृतज्ञतेमुळे मी भारावलो आहे. बीसीसीआयने भारतीय संघात खेळण्यासाठी एका 17 वर्षांच्या मुलावर आत्मविश्वास दाखवला. माझ्या क्रिकेटची कारकीर्द घडवण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या बीसीसीआयचा मी कायम कायम ऋणी असेल.' 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना लहान मुलासारख्या दिसणाऱ्या पार्थिवने वयाच्या 17 व्या वर्षी कर्णधार सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला होता. त्याने भारतीय संघासाठी एकूण 65 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्याने 25 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. तसेच 38 एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. 
 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 736 धावा काढल्या आहेत. तर कसोटीमध्ये  934 धावा करताना त्याने 6 अर्धशतके  झळकावली होती. यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान मिळालेल्या पार्थिवने कसोटीमध्ये 62 झेल घेतले तर 10 जणांना यष्टीचितही केले आहे.  

पार्थिवने 2002मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. दक्षिण अफ्रिकेत भारत 'अ' संघाकडून चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला इंग्लड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याने त्यावेळी एकही रणजी सामना खेळला नव्हता. भारतीय संघातून 2004मध्ये वगळल्यानंतर त्याने आपला पहिला रणजी सामना खेळला होता. 

भारतीय संघात धोनीचे आगमन झाल्यानंतर पार्थिवला भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर कित्येक वर्षे आयपीएल आणि रणजी सामन्यांमध्ये खेळल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी त्याला भारतीय संघाच  स्थान मिळाले. मात्र, त्यातही त्याला म्हणावी तशी संधी देण्यात आली नव्हती. भारतीय संघात ज्या कर्णधारांच्या  नेतृत्वात त्याला संधी मिळाली त्यांचे त्याने आभारही मानले आहेत. 
 

 
  

 

संबंधित बातम्या