आशिया चषक रद्द झाल्यास त्याला भारत जबाबदार असेल; पाकचा आरोप

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

भारतामुळे यंदाची आशिया चषक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.

भारतामुळे यंदाची आशिया चषक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी आशिया कप टूर्नामेंट बद्दल बोलताना, भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला तर यावर्षी जूनमध्ये होणारा आशिया चषक रद्द होऊ शकेल, असे म्हटले आहे. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अंतिम सामन्यात पोहोचल्यास आशिया चषक स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलावी लागणार असल्याचे एहसान मणी यांनी सांगितले आहे. 

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी कराचीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, आशिया चषक स्पर्धा मागील वर्षी खेळवण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा यावर्षी आयोजित करण्याचे ठरवण्यात आले होते. पण आता यावर्षी देखील ही स्पर्धा आयोजित करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनमध्ये होणार आहे. आणि श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धा जून मध्ये आयोजित करणार असल्याचे म्हटले होते. आणि त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तारीख व आशिया चषक स्पर्धेची तारीख जवळपास एकाचवेळी येत असल्यामुळे आशिया चषक स्पर्धेवर यंदा देखील पाणी फिरण्याची शक्यता असल्याचे एहसान मणी यांनी सांगितले. इतकेच नाही तर, ही स्पर्धा 2023 पर्यंत पुढे जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप  

त्यानंतर, पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी देखील याबाबत बोलताना भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाईल आणि त्यामुळे आशिया चषक स्पर्धा स्थगित कराव्या लागणार असल्याचे म्हटले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगण्याची शक्यता अधिक असल्याचे ते म्हणाले. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेनंतरच याबाबतचा निश्चित निकाल लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.     

याव्यतिरिक्त, यंदाचा आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात येणार आहे. आणि या स्पर्धेसाठी आयसीसी व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व्हिसाबाबत पत्र पाठविल्याची माहिती पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी दिली. खेळाडू, क्रिकेट चाहते आणि पत्रकार यांना भारताकडून व्हिसा मिळणार असले तर तसे लेखी देण्यात येण्याची मागणी पत्रात केली असल्याचे त्यांनी सांगितले. व शिवाय भारताकडून व्हिसा मिळणार नसेल तर आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप इतरत्र हलवण्यात यावा असे पत्रात नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच कोरोनाचा देखील मोठा प्रश्न असून, भारत ऐवजी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत आयोजित करण्यात येऊ शकते, असे एहसान मणी यांनी पुढे म्हटले आहे.  

   

संबंधित बातम्या