Goa Sports News
Goa Sports NewsDainik Gomantak

पर्ल कोलवाळकरला सेलिंगमध्ये सुवर्ण

पुण्यात झालेल्या इनलँड एन्टप्राईज स्पर्धेत विकास कपिलासह अव्वल

पणजी : गोव्याच्या पर्ल कोलवाळकर हिने मुंबईच्या विकास कपिला याच्या साथीत सेलिंगमधील प्रतिष्ठेच्या इनलँड एन्टरप्राईज स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीत झाली.

स्पर्धेत 75 बोटी (संघ) होत्या. पर्ल-विकास यांची सुरवात निराशाजनक ठरली. पहिल्या शर्यतीत 39व्या स्थानी घसरुनही त्यांनी अखेरीस बाजी मारली. विजेतेपद पटकावताना दुसऱ्या क्रमांकावरील अयाझ शेख व उपकार सिंग यांच्यावर तीन गुणांची आघाडी मिळविली.

पर्ल यापूर्वी 2017 साली इनलँड एन्टरप्राईज स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हा तिला ‘यंगेस्ट गर्ल हेल्म’ पुरस्कार मिळाला होता. नंतर 2018 साली तिने ‘यंगेस्ट हेल्म’ करंडक पटकावला. अवघ्या काही वर्षांतच खडकवासला येथील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिने विजेतेपदापर्यंत मजल मारली. मेहनत आणि दृढनिश्चयाच्या बळावर तिने आता सेलिंगमध्ये ठसा उमटविला आहे.

पाच वर्षांपासून अथक मेहनत

पर्ल कोलवाळकर मागील पाच वर्षांपासून पाण्यात अथक मेहनतीच्या बळावर कामगिरी सुधारताना दिसते. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात दहावीची परीक्षा देण्याऐवजी तिने सहा राष्ट्रीय मानांकन स्पर्धांत भाग घेतला, तसेच गतवर्षी ती अबुधाबी येथील आशियाई सेलिंग स्पर्धेतही सहभागी झाली. यापैकी चार स्पर्धांत पर्लने पदके जिंकली.

प्रतिष्ठेच्या पुरस्काराची मानकरी

‘प्रधानमंत्री बालशक्ती’ पुरस्काराची पर्ल मानकरी आहे. तिला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मिळाला. याशिवाय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्या सेलिंग आणि विंडसर्फिंगमधील कामगिरीचे कौतुक केले आहे.

युरोपमधील स्पर्धेत सहभाग

गोवा सरकारच्या ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा नैपुण्य संपादन’ योजनेअंतर्गत पर्ल कोलवाळकर आता युरोपातील आयएलसीए 4 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेईल. त्यापूर्वी ती माल्टा येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण शिबिर पूर्ण करेल, अशी माहिती गोवा यॉटिंग असोसिएशनतर्फे देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com