पेडे-म्हापसा हॉकी मैदानावर नव्याने टर्फ

Dainik Gomantak
गुरुवार, 25 जून 2020

मैदानावरील अगोदरच्या ॲस्ट्रो टर्फ पृष्ठभागाला सुरकत्या पडल्या होत्या. त्यामुळे हे मैदान हॉकी खेळण्यास धोकादायक ठरले होते. जागतिक हॉकी महासंघाची मान्यता असलेल्या संस्थेने मागील फेब्रुवारी महिन्यात पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानाची पाहणी केली होती.

पणजी

गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त तयार करण्यात आलेल्या पेडे-म्हापसा क्रीडा संकुलातील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे काम निकृष्ट ठरले होते, त्याची गंभीर दखल घेत राज्य क्रीडा प्रशासानाने संबंधित ठेकेदारास पुन्हा मैदान तयार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता नव्याने टर्फ बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मैदानावरील अगोदरच्या ॲस्ट्रो टर्फ पृष्ठभागाला सुरकत्या पडल्या होत्या. त्यामुळे हे मैदान हॉकी खेळण्यास धोकादायक ठरले होते. जागतिक हॉकी महासंघाची मान्यता असलेल्या संस्थेने मागील फेब्रुवारी महिन्यात पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानाची पाहणी केली होती. त्यावेळी टर्फचे परीक्षण केल्यानंतर, पाहणी करणाऱ्या संस्थेने मैदानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मैदानावरील ॲस्ट्रो टर्फ सदोष असल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वापरासाठी या हॉकी मैदानात योग्यतेचे प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. हे मैदान सामने खेळविण्यासाठी अयोग्य असल्याचा शेरा तपासणी संस्थेने अहवालात मारला होता.
पेडे-म्हापसा क्रीडा संकुलातील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान सदोष ठरल्यामुळे त्यावर पुन्हा दर्जेदार ॲस्ट्रो टर्फ बसविण्यावाचून राज्य क्रीडा प्रशासनासमोर पर्याय नव्हता. प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारने पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानासाठी अंदाजे ८.६ कोटी रुपये खर्च केले होते.
गोव्यातील ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य प्रशासनाने घेतला आहे. अगोदरच्या नियोजनानुसार ही स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार होती. कोविड-१९ पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या नव्या तारखा आणि आयोजनासंदर्भात स्थानिक आयोजन समितीची सप्टेंबर महिन्यात बैठक अपेक्षित आहे.
पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुष व महिला गटातील हॉकी सामने नियोजित आहेत. राज्यात एकही हॉकी स्टेडियम नाही, त्यामुळे पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान राज्यातील हॉकीसाठी पर्वणी ठरणार आहे.

 

संबंधित बातम्या