बांदोडकर गोल्ड ट्रॉफी विस्मरणात

Dainik Gomantak
रविवार, 28 जून 2020

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे निस्सीम क्रीडा आणि फुटबॉलप्रेमी. त्यांनी स्वःखर्चाने बांदोडकर गोल्ड ट्रॉफीची निर्मिती केली. १९६९ मध्ये बांदोडकर गोल्ड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

किशोर पेटकर

पणजी

एकेकाळी भारतीय फुटबॉलमध्ये प्रतिष्ठेची असलेली बांदोडकर गोल्ड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा विस्मरणात गेली आहे. चार वर्षांपूर्वी या स्पर्धेचे शेवटच्या वेळेस आयोजन झाले होते. अधूनमधून या ट्रॉफीच्या सोन्याविषयी प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामुळे स्पर्धेची आठवण होते एवढंच.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे निस्सीम क्रीडा आणि फुटबॉलप्रेमी. त्यांनी स्वःखर्चाने बांदोडकर गोल्ड ट्रॉफीची निर्मिती केली. १९६९ मध्ये बांदोडकर गोल्ड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९७० साली स्पर्धेला प्रत्यक्ष मैदानावर सुरवात झाली. वास्कोतील टिळक मैदानावर झालेल्या पहिल्या स्पर्धेत जालंधर-पंजाबच्या लीडर्स क्लबने विजेतेपद मिळविले. त्यांना गोव्याच्या साळगावकर क्लबने चांगलेच झुंजविले. पहिल्या लढतीत १-१ अशी गोलबरोबरी झाल्यानंतर फेरलढतीत लीडर्स क्ल‍बने १-० अशी बाजी मारली. बांदोडकर गोल्ड कपच्या पहिल्या स्पर्धेत साळगावकर क्लबचा गोलरक्षक सुभाष सिनारी याची कामगिरी नेत्रदीपक ठरली होती. हा सारा उल्लेख गोवा फुटबॉल असोसिएशनच्या द ग्रास ईज ग्रीन इन गोवा’ या पुस्तकात सापडतो.

१९७० पासून १९८४ पर्यंत बांदोडकर गोल्ड ट्रॉफी नियमितपणे खेळली गेली. १९८५१९८७ व १९८९ मध्ये स्पर्धा झाली नाही. गोव्याच्या धेंपो स्पोर्टस क्लबने ही स्पर्धा आठ वेळा जिंकली आहे. बांदोडकर गोल्ड ट्रॉफी जिंकणारा वास्को स्पोर्टस क्लब हा पहिला गोमंतकीय संघ आहे. १९७१मध्ये त्यांनी धेंपो क्लबला अंतिम लढतीत एका गोलने नमविले. धेंपो क्लबव्यतिरिक्त गोमंतकीय संघांत साळगावकरने क्लबने चार वेळावास्को क्लबने दोन वेळातर सेझा फुटबॉल क्लबने एक वेळ विजेतेपद पटकाविले आहे.

कालांतराने बांदोडकर गोल्ड ट्रॉफीकडे दुर्लक्ष झाले. सोन्याचा हा करंडक बॅंकेच्या लॉकरमध्ये झुरला. अखेर मे २०१६ मध्ये या ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धेला पुनरागमनाचा मुहूर्त सापडला. २१ वर्षांखालील वयोगटात ही स्पर्धा घेण्याचे ठरले. धुळेर-म्हापसा येथील जीएफए स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत पुणे एफसीने धेंपो स्पोर्टस क्लबवर ४-१ फरकाने विजय नोंदवून ट्रॉफीवर नाव कोरले. त्यानंतर बांदोडकर गोल्ड ट्रॉफी पुन्हा विस्मरणात गेली.

 गोमंतकीय विजेते संघ

- धेंपो क्लब (८) ः १९७६१९७८१९८२१९८३१९८४१९८६१९९०१९९१

- साळगावकर क्लब (४) ः १९८११९८८१९९२१९९४-९५

- वास्को क्लब (२) ः १९७११९७५

- सेझा फुटबॉल क्लब (१) ः १९७९

संबंधित बातम्या