बांदोडकर मैदानाच्या खेळपट्ट्यांवर हिरवळ!

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

खानापूर-हुबळी भागातून माती मागविण्यात आली असून लॉकडाऊन ४.०मुळे ट्रक येऊ शकलेले नाही. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच माती पणजीत दाखल होण्याचे संकेत आहेत

पणजी

पणजी जिमखान्याच्या नूतनीकरण झालेल्या ऐतिहासिक भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या पाचपैकी दोन खेळपट्ट्यांवर हिरवळीचे रोपण करण्यात आले आहे.

‘‘मैदानावरील एकूण पाच खेळपट्ट्यांपैकी दोन खेळपट्ट्यांवर हिरवळीचा थर आला आहे. पाऊस सुरू होईपर्यंत दर दिवशी तीन वेळा या दोन्ही खेळपट्ट्यांना नियमितपणे पाणी द्यावे लागेल. बाकी तीन खेळपट्ट्यांचे काम अंतिम टप्प्यात असून खास मातीचा थर टाकल्यानंतर त्यावर हिरवळीचे रोपण केले जाईल. खानापूर-हुबळी भागातून माती मागविण्यात आली असून लॉकडाऊन ४.०मुळे ट्रक येऊ शकलेले नाही. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लवकरच माती पणजीत दाखल होण्याचे संकेत आहेत,’’ असे गोवा क्रिकेट असोसिएशनकडून (जीसीए) सांगण्यात आले.

पणजी जिमखान्याबरोबरच्या सामंजस्य करारानुसार भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या खेळपट्ट्यांच्या काम जीसीएतर्फे करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मान्यताप्राप्त क्युरेटर सूर्यकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टीचे काम सुरू आहे. पणजी जिमखान्याचे सदस्य नरहर (ताता) ठाकूर व जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर खेळपट्टी काम प्रकल्पाचे समन्वयक आहेत.

पावसाळ्यापूर्वी पाचही खेळपट्ट्यांच्या काम पूर्ण करण्यावर जीसीएचा भर आहे. पावसाळ्यानंतर खेळपट्ट्या सज्ज होण्याचे नियोजन असून २०२०-२१ मोसमात या ऐतिहासिक मैदानावर पूर्ण बीसीसीआयचे सामने खेळविण्यासाठी जीसीए प्रयत्नशील आहे. पूर्वी हे मैदान गोव्यासाठी रणजी क्रिकेट स्पर्धेतील नियमित केंद्र होते. या मैदानावर १९८६-८७ ते २००५-०६ या कालावधीत एकूण २६ प्रथम श्रेणी सामने खेळले गेले आहेत. याशिवाय बीसीसीआयच्या वयोगटतसेच महिला गटातील सामन्यांचेही या मैदानावर आयोजन झाले आहे.

‘‘पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या सर्व खेळपट्ट्या तयार झाल्याकी जीसीएपाशी मैदानाचे पर्याय उपलब्ध असतील. पर्वरीसांगेमडगाव क्रिकेट क्लबचे डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमसह बांदोडकर मैदानाच्या उपलब्धतेमुळे बीसीसीआयचे सामने गोव्यात मोठ्या संख्येने खेळविता येतील. एकावेळी तीन सामन्यांचे आयोजन करणेही जीसीएला शक्य होईल.  शिवाय नव्या मोसमात राज्य पातळीवरील क्रिकेट सामनेही जीसीएला बांदोडकर मैदानावर खेळविणे शक्य होईल,’’ असे जीसीएकडून सांगण्यात आले. रणजी करंडक१९ वर्षांखालील कुचबिहार करंडक२३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक सामन्यांच्या तारखा जोडून आल्यानंतर जीसीएला घरच्या मैदानावल सामन्यांसाठी एका वेळी तीन मैदानांची गरज भासते.

संबंधित बातम्या