श्रेयस अय्यरला का जाणवतेय सरावाच्या आणि सामन्याच्या विकेटमध्ये तफावत?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

श्रेयस अय्यरने सरावासाठी आणि सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीत खूपच फरक असल्याने आव्हान जास्त खडतर झाल्याचे नमूद केले.

कॅनबेरा-  ऑस्ट्रेलियात वेगवान नव्हे तर उसळत्या चेंडूंचे आव्हान जास्त असते, असे सांगतानाच श्रेयस अय्यरने सरावासाठी आणि सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीत खूपच फरक असल्याने आव्हान जास्त खडतर झाल्याचे नमूद केले.

आयपीएलच्या दुबईहून आम्ही ऑस्ट्रेलियात आलो. विलगीकरणाचे १४ दिवस नियम पाळणे कठीण होते. तरीही पराभवासाठी हे कारण नक्कीच देणार नाही, असे श्रेयसने सांगितले.

ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना वेग नाही उसळत्या चेंडूंचे आव्हान असते. वेगाला आता कोणी दचकत नाही. तंत्रात बदल करताना इथल्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना मिळणारी उसळी त्रास देते. सरावासाठी असलेली खेळपट्टी आणि सामने झालेली खेळपट्टी यात खूपच फरक होता. त्यामुळे त्या खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी खेळात तातडीने बदल करणे आव्हानात्मक होते, असे श्रेयसने सांगितले. पहिल्या सामन्यात श्रेयस उसळत्या चेंडूवर बाद झाला. याबाबत तो म्हणाला, ऑस्ट्रेलियात आखूड टप्प्याच्या चेंडूला सामोरे जाण्याची तयारी होती. बाद झालो तो चेंडू पुल करायचा की अप्पर कट, या द्विधा मनःस्थितीमुळे.

पहिल्या दोन सामन्यांत आपल्या गोलंदाजांना अपेक्षित मारा करता न आल्याने यश मिळाले नाही. यानंतरही गोलंदाजांना लगेच लक्ष्य करणे चुकीचे आहे. आपले गोलंदाज दर्जेदार आहेत. लवकरच त्यांच्यात सुधारणा होईल. ते प्रभावी मारा करतील, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला. 

संबंधित बातम्या