बांबोळीत सर्वाधिक आयएसएल सामन्यांचे नियोजन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

स्पर्धेला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरवात होणे अपेक्षित आहे. स्पर्धेत एकूण १० संघांचा समावेश असून ९५ सामने होतील. सर्व सामने मानक परिचालन पद्धतीनुसार (एसओपी) रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील.

पणजी: गोव्यात येत्या नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सर्वाधिक सामने बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर खेळविण्याचे नियोजन आहे. याशिवाय फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवरही सामने होतील.

कोरोना विषाणू महामारीच्या देशातील परिस्थितीनुरूप कडक उपाययोजनांसह आयएसएल स्पर्धा एकाच राज्यात खेळविण्याचे स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी ठरविले आहे. त्यानुसार संपूर्ण स्पर्धा नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गोव्यात खेळली जाईल. स्पर्धेला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरवात होणे अपेक्षित आहे. स्पर्धेत एकूण १० संघांचा समावेश असून ९५ सामने होतील. सर्व सामने मानक परिचालन पद्धतीनुसार (एसओपी) रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील.

कोविड-१९ मुळे गोव्यातील पर्यटनावर प्रतिकुल परिणाम झालेला आहे. आयएसएल स्पर्धा गोव्यात होत असल्यामुळे राज्यातील पर्यटनास चालना मिळेल, असा विश्वास मागे राज्याचे क्रीडा व पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी व्यक्त केला होता. पर्यटनास चालना हे उद्दिष्ट राखून गोवा सरकारने आयएसएल स्पर्धेसाठी सर्व सुविधा अंदाजे अर्ध्या रकमेत एफएसडीएल यांना उपलब्ध करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती सूत्राने दिली. स्पर्धा आणि संघांचा सराव या अनुषंगाने ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत आयएसएल संबंधित साऱ्या घटना गोव्यातच घडतील, त्यामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत येण्याचे मानले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मधील आयएसएल स्पर्धेतील एकूण ९५ सामन्यांपैकी सर्वाधिक ४१ सामने बांबोळीत खेळले जातील. हे मैदान चार संघांसाठी होमग्राऊंड असल्यामुळे सामन्यांची संख्या जास्त असेल. फातोर्डा व वास्को येथील प्रत्येकी २७ सामने खेळविण्याचे नियोजन आहे. त्यानिमित्त तिन्ही मुख्य स्टेडियमवरील साधनसुविधांचे काम सप्टेंबरपासून सुरू होईल आणि त्यासाठी आयोजकांची यंत्रणा पुढील आठवड्यात गोव्यात दाखल होईल. तिन्ही स्टेडियमच्या मैदानाचे टर्फ आणि प्रकाशझोत यंत्रणा सुधारणेवर जास्त भर राहील. सराव मैदानांचेही नूतनीकरण होईल.

सरावासाठी १० मैदाने
आयएसएल स्पर्धेतील संघांच्या सरावासाठी प्रत्येक संघास एक अशी एकूण १० मैदाने राज्य सरकार आयोजकांना उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार, गोवा क्रीडा प्राधिकरणाने मैदानांची सूची तयार केल्याचे सूत्राने सांगितले. दक्षिण गोव्यात सहा सराव मैदाने असतील. यामध्ये बाणावली येथील वाडी मैदान, उतोर्डा मैदान, बेताळभाटी मैदान, कुंकळ्ळी मैदान, नागोवा पंचायत मैदान व नावेली मैदानाचा समावेश आहे. उत्तर गोव्यात चार मैदाने सरावासाठी असतील. यामध्ये पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुल मैदान, कळंगुटचे पोरियाट मैदान, कांदोळीचे गुस्ताव मोंतेरो मैदान आणि मोरजी मैदानाचा समावेश आहे.

बांबोळीत जास्त संघ
आयएसएल स्पर्धा आयोजकांनी गतमोसमातील (२०१९-२०) साखळी फेरी गुणतक्ता क्रमवारीनुसार दहा संघांसाठी होमग्राऊंड्सची विभागणी केली आहे. सध्याच्या नियोजनानुसार, बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर चार संघांसाठी होमग्राऊंड असेल. यामध्ये चेन्नईयीन एफसी, मुंबई सिटी एफसी, ओडिशा एफसी, केरळा ब्लास्टर्स या संघांचे होमग्राऊंड सामने होतील. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम एफसी गोवा, एटीके-मोहन बागान व बंगळूर एफसी यांच्यासाठी, तर वास्को येथील टिळक मैदान स्टेडियम जमशेदपूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड व हैदराबाद एफसी या संघांसाठी होमग्राऊंड असेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या