गोव्यात जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्रांचा होणार विकास

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 मे 2021

केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत गोव्यात दोन ठिकाणी जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्र विकसित केले जाईल.

पणजी: केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया (Khelo India) अभियानांतर्गत गोव्यात दोन ठिकाणी जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्र विकसित केले जाईल. या योजनेअंतर्गत उत्तर गोव्यातील पेडे-म्हापसा (Mapusa) येथे हॉकी (Hockey) , तर दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम संकुलात फुटबॉल खेळासाठी पायाभूत सुविधा विकास साधला जाईल, अशी माहिती खेलो इंडिया गोवाच्या नोडल अधिकारी मोनिका दोरादो यांनी दिली.

दोन्ही ठिकाणच्या केंद्रांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे गोवा क्रीडा प्राधिकरणास निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय राज्य सरकार-गोवा क्रीडा प्राधिकरण यांना संबंधित खेळात मार्गदर्शनासाठी माजी खेळाडूंची प्रशिक्षक-मेंटॉरपदासाठी नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, असे दोरादो यांनी नमूद केले. (Play India centers will be developed at district level in Goa)

AFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास

गोव्याने मानले आभार

गोव्यासाठी दोन खेलो इंडिया केंद्र मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री-क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचे आभार मानले आहेत.

सात राज्यांत योजना

देशातील सात राज्यांत एकूण 143 खेलो इंडिया केंद्र विकसित करण्याचे नियोजन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले आहे. भारताला 2028 मधील ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत जगातील पहिल्या 10 देशांत आणण्याचे ध्येय आहे. क्रीडा साधनसुविधांचा पाया आम्ही भक्कम करत आहोत, असे रिजिजू यांनी योजना जाहीर करताना सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रात एक खेळ-क्रीडाप्रकारातील गरज पूर्ण करण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्र, मिझोराम, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यात ही केंद्र कार्यान्वित होतील. सर्व 143 खेलो इंडिया केंद्रांचे एकूण अंदाजपत्रक 14.30 कोटी रुपयांचे आहे. चार वर्षांच्या कालावधीत देशभरात एक हजार नवी खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्याची योजना गतवर्षी जूनमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली होती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने प्रत्येक राज्य सरकारच्या सहकार्याने खेलो इंडिया केंद्र सुरू करण्याची योजना आखली असून त्याअंतर्गत देशभरात पायाभूत क्रीडा सुविधा उपलब्धीवर भर राहील. गोव्यातील खेलो इंडिया केंद्र योजनेसाठी 20 लाख रुपयांचे अंदाजपत्रक असेल. 

आशियाई स्पर्धेत भारताच्या शिवा थापाची उपांत्यपूर्व फेरीत धडक, हुस्सामुद्दिनचीही...

कांपाल येथे क्रीडा नैपुण्य केंद्र

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गतवर्षी गोव्यासाठी खेलो इंडिया क्रीडा नैपुण्य केंद्र मंजूर केले होते. हे केंद्र कांपाल येथील क्रीडा संकुलात साकारले जाईल. या केंद्रात जलतरण, टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळांचे साहित्य, प्रशिक्षक, क्रीडा विज्ञान आदी सुविधांवर भर असेल. त्यासाठी राज्य सरकारला केंद्रीय क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सहकार्य लाभेल.
 

संबंधित बातम्या