बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकल्याने खेळाडूंमध्ये शिथिलता: गोपीचंद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

देशांच्या संघांसाठी सर्वांत प्रतिष्ठेची असलेली थॉमस आणि उबर करंडक स्पर्धा जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर टाकली. डेन्मार्क ओपनही रद्द करण्यात आल्यामुळे जागतिक बॅडमिंटन संकटात सापडले आहे.

नवी दिल्ली: स्पर्धा लांबणीवर टाकणे किंवा नव्याने तारखा देणे या फेऱ्यात जागतिक बॅडमिंटन अकडले आहे. एकूणच जागतिक बॅडमिंटनचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंमध्येही सराव सुरू करण्यावरून शिथिलता आली आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. देशांच्या संघांसाठी सर्वांत प्रतिष्ठेची असलेली थॉमस आणि उबर करंडक स्पर्धा जागतिक बॅडमिंटन फेडरेशनने कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर टाकली. डेन्मार्क ओपनही रद्द करण्यात आल्यामुळे जागतिक बॅडमिंटन संकटात सापडले आहे.

मागे राहून चालणार नाही
कोरोनाचा धोका टळलेला नसला, तरी जगात क्रीडा क्षेत्र सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस, फुटबॉल, फॉर्म्युला वन आणि क्रिकेटही पुन्हा मार्गावर लागले आहे. बॅडमिंटनलाही मागे राहून चालणार नाही, असे गोपीचंद यांनी म्हटले .

चिंता वयोगटाची
ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू सरावाने सज्ज होऊ शकतील; परंतु मला भीती १३, १४ किंवा १९ वर्षांखालील वयोगटाच्या खेळाडूंची आहे. सहा ते आठ महिन्यांचा ब्रेकनंतर लय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नसेल, अशी भीती गोपीचंद यांनी व्यक्त केली.

...हा आहे मार्ग
गोपीचंद यांनी देशातील अव्वल खेळाडूंसाठी बायो बबल वातावरण तयार करून लीग सुरू करण्याचा मार्ग सुचवला आहे. या लीगमध्ये अव्वल खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळून आंतरष्ट्रीय आव्हानासाठी सज्ज होऊ शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या