प्लेट गटात खेळल्याने गोव्याला विजयाचा `बोनस`

dainik gomantak
मंगळवार, 26 मे 2020

आता पणजी जिमखान्याचे भाऊसाहेब बांदोडकर मैदानाची खेळपट्टी तयार होत असल्याचे भविष्यात गोव्यात जास्त संघांची स्पर्धा घेणे जीसीएला शक्य होईल.

पणजी,

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गतमोसमात रणजी करंडक आणि कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील स्पर्धेच्या प्लेट गटात खेळणे गोव्यासाठी विजयांच्या दृष्टीने फायदेशीर ठरले. मोसमात पुरुष गटातील सर्व स्पर्धांत घरच्या मैदानावर १६ पैकी नऊ सामने जिंकले.

गोव्याचा संघ २०१९-२० मोसमात १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक, १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मिळून एकूण ३३ सामने खेळला, त्यापैकी १७ सामने अवे, तर १६ सामने होम मैदानावर झाले.

गोव्याच्या रणजी आणि १९ वर्षांखालील संघाला प्लेट गटातील कमजोर संघांविरुद्ध खेळल्याचा फायदा झाला. त्यात १९ वर्षांखालील संघाने घरच्या मैदानावरील सर्व चारही सामने जिंकले, तर रणजी करंडक स्पर्धेत गोव्याचा संघ प्रथमच घरच्या मैदानावर पाच सामने खेळला. त्यापैकी चार सामने जिंकले, तर एक सामना अनिर्णि राहिले. प्लेट गटात अपराजित राहिलेल्या गोव्याने रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आगामी मोसमातील एलिट गटासाठी पात्रताही मिळविली.

गोवा क्रिकेट असोसिएशनने गतमोसमात घरच्या मैदानावर १६ सामन्यांचे यजमानपद पेलले, पण मैदानांची कमतरता असल्यामुळे बहुसंघांची स्पर्धा घेणे जीसीएला शक्य झाले नाही. 

 

संबंधित बातम्या