Sagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसांकडून 'चितपट'

sushil kumar
sushil kumar

छत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून प्रकरणात फरार असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (Sushil Kumar) याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीच्याच मुंडका भागात अटक केली आहे. सुशीलबरोबर त्याचा जोडीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. 4 मे रोजी रात्री उशिरा झालेल्या घटनेपासून हे दोघेही फरार होते. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा जामीन अर्ज फेटाळला होता. स्पेशल सेल आता या दोघांना रोहिणी कोर्टात हजर करेल. त्यानंतर सुशील आणि अजय यांना उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. या विशेष सेलचे प्रमुख निरीक्षक शिवकुमार, निरीक्षक करंबीर आणि एसीपी अतरसिंग होते. सुशीलवर आयपीसी कलम 302 (खून), 365 (अपहरण), 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.(Police arrest Olympic medalist Sushil Kumar)

दिल्ली पोलिसांचा पंजाबमध्येही छापा
स्पेशल सेल गुन्हे शाखेशिवाय दिल्ली पोलिसांच्या अनेक पथकांनी पंजाबमधील बठिंडा, मोहाली यासह अनेक राज्यांमध्ये छापा टाकला होता. दिल्लीतही अनेक तळांवर छापे टाकण्यात आले, परंतू, सुशील हाती लागला नाही. आदल्या दिवशी सुशीलच्या अटकेच्या अफवा आल्या होत्या.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील आणि त्याच्या साथीदारांनी 4 मे रोजी रात्री उशिरा दिल्लीच्या मॉडेल टाऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन मारहाण केली. मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांना स्टेडियमचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. त्यात सुशील हा सागर आणि त्याच्या साथीदारांना हॉकी स्टिकने मारताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात कुस्तीपटूंच्या दोन गटात चकमकी दरम्यान गोळीबारही झाला. यात 5 कुस्तीगीर जखमी झाले. यामध्ये सागर (23), सोनू (37), अमित कुमार (27) आणि इतर 2 कुस्तीपटूंचा समावेश आहे.

घटनास्थळावरून डबल बॅरल गन आणि काडतुसे सापडली
घटनास्थळावरून पोलिसांनी डबल बॅरल गन आणि 3 जिवंत काडतुसे याशिवाय 5 वाहने जप्त केली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सुशील कुमारच्या भूमिकेबाबत ते चौकशी करीत आहेत, कारण त्याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी सुशील व इतर आरोपींच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.

सुशील कुमारने आरोप फेटाळून लावले
घटनेनंतर दुसर्‍या दिवशी सुशीलने या संदर्भात स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता की ''ते आमचे सहकारी कुस्तीपटू नव्हते. आम्हीच पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली की काही अज्ञात लोक आमच्या आवारात घुसून भांडत आहेत''. सुशीलने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com