गोव्याच्या चिमूकलीचे स्वप्न 'मला दीपा कर्माकर व्हायचय'

गोव्यात (Goa) राष्ट्रिय पातळीवरची एक जिमनॅस्ट तयार होत असून ही गोव्याच्या क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
दीपा कर्माकर आणि प्रीत
दीपा कर्माकर आणि प्रीत Dainik Gomantak

आठ वर्षीय प्रीत प्रसाद सावंत देसाईची फेब्रुवारी 2022 मधील खेलो इंडिया (Khelo India) क्रीडा स्पर्धांमध्ये जिमनॅस्टिक (Gymnastics) प्रकारात निवड झाल्याची बातमी थडकली व तिच्याविषयी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रीत मडगाव (Margao) येथील विद्याभारती प्राथमिक शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकते.

“पाच वर्षांचीच असताना तिला जिमनॅस्टीची रुची व आवड निर्माण झाली. सुरवातीला आम्ही तिला बुद्धिबळ खेळण्यासाठी पाठवली व तिथे तिचे मन रमेना. नंतर तिला मडगाव येथील जिमनॅस्ट सेंटरमध्ये पाठवली व तिथेच तिच्यात अंगी असलेल्या गुणांचे प्रदर्शन व्हायला सुरुवात झाली.” असे तिचे वडिल प्रसाद सावंत देसाई यानी सांगितले.

जिमनॅस्ट सेंटरमध्ये, केवळ एका महिन्याभरातच, प्रशिक्षक देत असलेले मार्गदर्शन ती सहज आत्मसात करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला पुढील स्तरावरचे ट्रेनिंग (Training) सुरु केले गेले. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये (National competitions) भाग घेण्यासाठी नियमाप्रमाणे 9 वर्षे पुर्ण व्हावी लागतात. मात्र खेलो इंडियामध्ये (Khelo India) तिला ती आठ वर्षांची असूनदेखील संधी प्राप्त झाली असे तिच्या वडिलांनी सांगितले.

“खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी अगदी उत्सुक आहे व तशी तयारी सुरु झाली आहे. 2022 साली दिल्लीतील एका स्पर्धेमध्ये, भारताची आघाडीची जिमनॅस्ट दिपा करमरकर हिची भेट घ्यायची संधी मला मिळाली. तिने त्यावेळी मला गोंजारले व तु एक सर्वोत्कृष्ट जिमनॅस्ट म्हणुन प्रसिद्ध होशील असे आपल्याला सांगितले” हे आठ वर्षीय प्रीत आवर्जून सांगते.

“मी दीपा कर्माकरची चाहती असुन मला तिच्याप्रमाणे बनायचे आहे. ऑलिंपिकमध्ये (Olympics) सहभागी होण्याची माझी प्रखर इच्छा आहे.” असेही प्रीत सांगते. “मी दररोज सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 4 ते 8, म्हणजे दिवसाला सहा तास सराव करते”.

प्रीतकडे, ती लहान वयाची असूनदेखील, जिमनॅस्टीकबद्दल चांगली आकलनशक्ती व शिकवलेले आत्मसात करण्याची क्षमता आहे, असे तिचे प्रशिक्षक व जिमनॅस्टीक सेंटरचे संचालक प्रताप ढेरे सांगतात. तिने अनेक पदके जिंकली आहेत. ऑलिंपिक स्तरावर पोहोचण्यासाठी किंवा दर्जा प्राप्त करण्यासाठी तिला आणखी सात ते आठ वर्षे लागतील असेही ढेरे म्हणाले. आर्टिस्टिक बॅलन्स बीम, आर्टिस्टीक फ्लोअर व आर्टिस्टीक ऑलराऊंड प्रकारात ती निश्र्चितच पारंगत होईल असा विश्वास ढेरे याना आहे.

ढेरे यानी 2014 साली हे सेंटर सुरु केले आहे व सद्या 100 पेक्षा जास्त मुलांना तिथे प्रशिक्षण दिले जाते असेही ढेरे यानी सांगितले. गोव्यात (Goa) राष्ट्रिय पातळीवरची एक जिमनॅस्ट तयार होते आहे. ही गोव्याच्या क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची व स्वागतार्ह अशीच गोष्ट आहे. आणि आता केवल आठ वर्षे वय असणारी प्रीत या क्षेत्रात ऑलिंपिकमध्ये भाग घ्यायचे स्वप्न पाहते आहे हे विशेष. प्रीतला दै. गोमन्तकच्या शुभेच्छा!

(मंगेश बोरकर)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com