एएफसी विभागात ऑस्ट्रेलियन्सना पसंती

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

आशियाई फुटबॉल महासंघाशी (एएफसी) संलग्न देशातील किमान एक फुटबॉलपटू संघात घेणे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघांसाठी बंधनकारक आहे. या नियमाची पूर्तता करताना ऑस्ट्रेलियातील फुटबॉलपटूंना जास्त पसंती मिळाली.

पणजी  : आशियाई फुटबॉल महासंघाशी (एएफसी) संलग्न देशातील किमान एक फुटबॉलपटू संघात घेणे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघांसाठी बंधनकारक आहे. या नियमाची पूर्तता करताना ऑस्ट्रेलियातील फुटबॉलपटूंना जास्त पसंती मिळाली.

आयएसएल स्पर्धेतील संघ २०२०-२१ मोसमासाठी सात परदेशी खेळाडू करारबद्ध करू शकतात, त्यापैकी एक खेळाडू आशियाई असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय पातळीवर एएफसीचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा कोटा पूर्ण करताना आयएसएल संघांनी कांगारूंच्या देशातील ए-लीग खेळाडू करारबद्ध केले. आगामी मोसमात दहा ऑस्ट्रेलियन फुटबॉलपटू आयएसएल स्पर्धेत खेळताना दिसतील. आयएसएल स्पर्धेतील अकरा संघांपैकी फक्त मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयीन एफसी या दोन संघांनीच ऑस्ट्रेलियातील फुटबॉलपटूशी करार केलेला नाही.

एटीके मोहन बागान एफसीने दोघा ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी करार केला आहे. गतमोसमातील १८ आयएसएल सामन्यांत ७ गोल आणि ५ असिस्ट अशी चमकदार कामगिरी करणारा ३२ वर्षीय डेव्हिड विल्यम्स याला कोलकात्यातील संघाने कायम राखले आहे. याशिवाय त्यांनी २८ वर्षीय मध्यरक्षक ब्रॅड इनमन याच्याशीही करार केला.
एफसी गोवा संघातील जेम्स डोनाची हा २७ वर्षीय ऑस्ट्रेलियन बचावपटू ताडमाड उंचीचा आहे. सहा फूट पाच इंच उंचीच्या हा खेळाडू एफसी गोवासाठी सेटपिसेसमध्ये उपयुक्त ठरण्याचे संकेत आहेत. २०१७ पासून बंगळूर एफसी संघाचा सदस्य असलेला ३४ वर्षीय ऑस्ट्रेलियन एरिक पार्तालू आणखी एक मोसम आयएसएल स्पर्धेत खेळेल. या मध्यरक्षकाने बंगळूर एफसीतर्फे ४९ सामन्यांत सात गोल व आठ असिस्टची नोंद करून उपयुक्तता सिद्ध केली आहे.

ओडिशा एफसीने ऑस्ट्रेलियातील ६ फूट ३ इंच उंचीचा बचावपटू जेकब ट्रॅट या २६ वर्षीय बचावपटूस करारबद्ध केले आहे. हैदराबाद एफसी संघात जोएल चियानेज हा ३० वर्षीय ऑस्ट्रेलियन आक्रमणाची जबाबदारी सांभाळेल. केरळा ब्लास्टर्सने २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन आघाडीपटू जॉर्डन मरे याला प्राधान्य दिले. जमशेदपूर एफसीनेही आघाडीफळीसाठी निकोलस फित्जेराल्ड या २८ वर्षीय  ऑसी खेळाडूची निवड केली. नॉर्थईस्ट युनायटेड संघातून २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन बचावपटू डायलन फॉक्स खेळेल. आयएसएलमधील नवा संघ एससी ईस्ट बंगाल संघाने ए-लीग स्पर्धेतील सहा फूट दोन इंच उंचीचा अनुभवी ३१ वर्षीय बचावपटू स्कॉल नेव्हिल याला करारबद्ध केले आहे.

संबंधित बातम्या