बैठकीसाठी जीएफए अध्यक्षावर दबाव
duler-stadium-mapusa-goa-stadiums

बैठकीसाठी जीएफए अध्यक्षावर दबाव

पणजी,

 कोविड-१९ महामारीचे कारण देत गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) व्यवस्थापकीय समितीची बैठक अजून घेतलेली नाही. संघटनेच्या कार्यालयात बैठक घेणे शक्य नसल्यास ऑनलाईन माध्यमांद्वारे घ्यावी यासाठी सदस्य एकवटले असून त्यांनी अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्यावर दबाव टाकला आहे.

जीएफएची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यावेळी निवडणून आलेल्या अध्यक्षांव्यतिरिक्त २० सदस्यीय व्यवस्थापकीय समितीतील १३ सदस्यांनी संयुक्त पत्रावर सही केली आहे. हे पत्र जीएफएचे सचिव ज्योवितो लोपिस यांना पाठविण्यात आले आहे. जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची शेवटची बैठक या वर्षी जानेवारीत झाली होती. विशेष बाब म्हणजे, पत्रावर सही केलेल्या १३ सदस्यांपैकी बरेच जण मागील निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांच्या पॅनेलमधून निवडून आले होते.

कोविड-१९ महामारीमुळे बैठक घेणे शक्य नाही हे जीएफए अध्यक्षांचे म्हणणे समजू शकतो, पण फिफा किंवा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणे शक्य आहे याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. जीएफएने क्लब आणि प्रशिक्षकांसाठी उजळी कार्यशाळा, सामनाधिकाऱ्यांसाठी कृतिसत्र ऑनलाईन घेतले, मात्र या पद्धतीने व्यवस्थापकीय समितीची बैठक का शक्य नाही असा सवाल करताना १३ सदस्यांनी संयुक्त पत्राद्वारे आश्चर्य व्यक्त केले आहे.

संयुक्त पत्रावर जीएफएचे उपाध्यक्ष (दक्षिण) अँथनी पांगो, खजिनदार दिओनिसियो डायस यांच्यासह वेल्विन मिनेझिस, बाबली मांद्रेकर, एडलियर डिक्रूझ, जाजू फर्नांडिस, जॉन डिसिल्वा, अँथनी लिओ फर्नांडिस, जोनाथन डिसोझा, मिगेल गोन्साल्विस, प्रकाश देसाई, फ्रान्सिस नुनीस व कॉझ्मे ऑलिव्हेरा यांची स्वाक्षरी आहे.

कोरोना विषाणू महामारीमुळे मागील २० मार्चपासून गोव्यात जीएफएच्या स्पर्धेतील एकही फुटबॉल सामना खेळला गेलेला नाही. नुकतेच जीएफए सचिवांना व्यवस्थापकीय सदस्य आणि संलग्न क्लबना पत्र पाठवून २०१९-२० मोसमा आटोपला असून २०२०-२१ मोसमाची तयारी करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. प्रो-लीगसह जीएफएच्या मागील मोसमातील बहुतेक स्पर्धा अपूर्ण असून काही स्पर्धा सुरू झाल्या नव्हत्या.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com