अल वहादचे धोकादायक आक्रमण रोखत; गोलरक्षक धीरजचा भक्कम बचाव

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

संयुक्त अरब अमिरातीच्या अनुभवी अल वाहदा क्लबला शनिवारी गोलशून्य बरोबरीत रोखले.

पणजी : एफसी गोवा संघाने पुन्हा एकदा आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील ई गटात भक्कम आणि झुंजार खेळ करत बरोबरीच्या एका गुणाची कमाई केली. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अनुभवी अल वाहदा क्लबला शनिवारी गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये अल वाहदाचे धोकादायक आक्रमण यशस्वीपणे थोपविलेला गोलरक्षक धीरज सिंग एफसी गोवाच्या बरोबरीत पुन्हा उल्लेखनीय ठरला. त्यापूर्वी निर्धारित वेळेतील शेवटच्या मिनिटास एफसी गोवाचा बचावपटू सेरिटन फर्नांडिस अल वाहदा क्लबच्या आक्रमणास वरचढ ठरल्यामुळे गोल होऊ शकला नाही.

एफसी गोवाने गटातील पहिल्या लढतीत कतारच्या अल रय्यान क्लबला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. सलग दुसऱ्या बरोबरीमुळे त्यांचे आता दोन गुण झाल आहेत. पहिल्या लढतीत इराणच्या पर्सोपोलिस एफसी एका गोलने हार पत्करलेल्या अल वाहदा क्लबने दुसऱ्या लढतीनंतर एका गुणासह खाते उघडले. एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना मंगळवारी (ता. 20) पर्सेपोलिस एफसीविरुद्ध होईल. त्याच दिवशी अल वाहदा क्लब अल रय्यानविरुद्ध खेळेल.(Preventing Al Wahads dangerous attack Strong defense of goalkeeper patience)

पूर्वार्धातील खेळात अल वाहदा क्लबने तुलनेत अधिक प्रमाणात वर्चस्व राखले, पण त्यांच्या आक्रमणात भेदकतेचा अभाव दिसला. एफसी गोवाने मागील लढतीप्रमाणेच यावेळेसही बचावावर जास्त लक्ष केंद्रित केले. सामन्याच्या 52व्या मिनिटास एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी आघाडीफळीत बदल करताना ईशान पंडिता याला माघारी बोलावून देवेंद्र मुरगावकरला संधी दिली, त्यानंतर एफसी गोवाच्या आक्रमणास धार आली. 54व्या मिनिटास एफसी गोवाच्या ब्रँडन फर्नांडिसने जबरदस्त फटका मारला होता, पण चेंडू गोलपट्टीस आपटल्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

एएफसी चँपियन्स लीगमधील ऐतिहासिक गुणानंतर अल वाहदाविरुद्ध लढत

सामन्याच्या 68व्या मिनिटास एफसी गोवाच्या देवेंद्र मुरगावकरने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली. अल वाहदाच्या बचावपटूंनी देवेंद्रवर दबाव टाकला असता त्याला एफसी गोवाच्या सहकाऱ्याकडून साथ लाभली नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये गोलरक्षक धीरज सिंगची चपळाई आणि दक्षतेमुळे अल वाहदा क्लबचे आक्रमण यशस्वी ठरू शकले नाही.

अल वाहदाच्या मध्यरक्षकास दुखापत

सामन्याच्या सुरवातीस अल वाहदा क्लबला धक्का बसला. त्यांच्या मध्यरक्षक अब्दुल हमाद याला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. हमाद याची एफसी गोवाचा मध्यरक्षक ग्लॅन मार्टिन्स याच्याशी चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात जोरदार टक्कर झाली. त्यामुळे प्रशिक्षक हेन्क टेन काटे यांना लवकरच बदल करावा लागला. सामन्याच्या बाराव्या मिनिटास मन्सूर अल हार्बी याने हमाद याची जागा घेतली.

दृष्टिक्षेपात

- एफसी गोवा संघ आयएसएलसह सलग 17 सामने अपराजित, 5 विजय, 12 बरोबरी

- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत एफसी गोवा आणि अल वाहदा क्लबला 180 मिनिटांच्या खेळानंतर गोल नोंदविण्यात अपयश

- एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत सलग 2 लढतीनंतर प्रथमच अल वाहदा क्लब गोल नोंदविण्यात असमर्थ

- अल वाहदा क्लब एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत 12व्यांदा सहभागी, तर एफसी गोवा प्रथमच

 

संबंधित बातम्या