यो-यो टेस्ट म्हणजे काय? पंतप्रधान मोदींची कोहलीस विचारणा

वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

भारतीय क्रिकेटपटूंची यो यो टेस्ट घेतली जाते. ही चाचणी काय असते, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यास केली.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटूंची यो यो टेस्ट घेतली जाते. ही चाचणी काय असते, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यास केली. त्याचबरोबर ही चाचणी कोहलीसही सक्तीची असते का, याबाबतही पंतप्रधानांना औत्युक्‍य होते.

फिट इंडिया मूव्हमेंटच्या एका वर्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहली तसेच अनेक फिटनेस तज्ज्ञांसह चर्चा केली. त्या वेळी मोदींनी यो-यो टेस्ट नेमकी काय असते आणि कर्णधार असल्याने कोहलीला सूट दिली जाते का अशीही विचारणा केली. ‘‘भारतीय खेळाडूंचा फिटनेस जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. जागतिक क्रीडापटूंच्या तुलनेत आपली तंदुरुस्ती खूपच कमी आहे. त्याकडे सध्या आम्ही लक्ष दिले आहे. कोणत्याही खेळासाठी तंदुरुस्ती अत्यावश्‍यक असते,’’ असे कोहलीने सांगितले.

भारतीय क्रिकेट संघातील स्थान निश्‍चित करण्यासाठी प्रत्येकास ही चाचणी द्यावी लागते, त्यास कोणीही अपवाद नसते. ही चाचणी मी सर्वप्रथम देतो. या चाचणीत उत्तीर्ण न झाल्यास निवडीसाठी माझाही विचार होत नाही. तंदुरुस्तीची संस्कृती निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे तंदुरुस्तीचा स्तर उंचावण्यास मदत होईल, असेही भारतीय कर्णधाराने सांगितले.

हेही महत्त्वाचे

  •  भारतीय मंडळाने संघनिवडीसाठी १६.१ ही पात्रता ठेवली आहे
  •  दोन वर्षांपूर्वी यात अपयशी ठरल्यामुळे संजू सॅमसनला भारत अ संघातून वगळले होते
  •  मोहम्मद शमीला याच कारणास्तव अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी वगळले होते
  •  काही तज्ज्ञांच्या मते मोसमात सातत्याने खेळलेला खेळाडू मोसमाच्या अखेरीस या चाचणीत अपयशी ठरण्याची शक्‍यता
  •  चयापचय क्रिया तसेच फुफ्फुसाच्या क्षमतेचा यो-यो निकालावर परिणाम होण्याची शक्‍यता
  •  आंतरराष्ट्रीय फुटबॉल तसेच हॉकीत यो-यो चाचणीचे महत्त्व, पण त्यावर निवड अवलंबून नसते
  •  एनबीए संघांनी ही चाचणी न करण्याचे ठरवले आहे
     

संबंधित बातम्या