डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमसाठी खासगी व्यवस्थापन

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

भाडेपट्टीवर देण्यासाठी गोवा क्रीडा प्राधिकरणाने मागविल्या विनंती प्रस्ताव निविदा

पणजी

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे व्यवस्थापन भविष्यात भाडेपट्टीवर खासगी आस्थापनाद्वारे हाताळणे जवळपास निश्चित झाले आहे. या प्रक्रियेसाठी स्टेडियमची मालकी असलेल्या गोवा क्रीडा प्राधिकरणाने (एसएजी) विनंती प्रस्ताव निविदा मागविल्या आहेत.

सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविले जाणारे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर गोव्यातील पहिले क्रीडा केंद्र ठरेल. हे स्टेडियम खासगी आस्थापनास भाडेपट्टीवर देण्याबाबत क्रीडा सचिव जे. अशोक कुमार यांनी दुजोरा दिला आहे. कोविड-१९ महामारीमुळे निविदा प्रक्रिया लांबली आहे.

गोवा क्रीडा प्राधिकरणास राज्य सरकारकडून आर्थिक निधी मिळतो. खर्चाबाबत सरकारवरही मर्यादा येतात. त्यामुळे आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर खासगी व्यवस्थापनाकडे भाडेपट्टीवर सोपविण्याचा निर्णय झाला आहे, असे अशोक कुमार यांचे म्हणणे आहे. इनडोअर स्टेडियम खासगी आस्थापनाच्या ताब्यात दिले, तरी या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी काही दिवस आरक्षित असतील. गोवा विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धा या ठिकाणी होतात, त्यास आडकाठी येणार नसल्याचे क्रीडा अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठानजीक हे इनडोअर स्टेडियम २०१४ साली तिसऱ्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेनिमित्त उभारण्यात आले होते. या भव्य क्रीडा केंद्राची निगराणी राखताना गोवा क्रीडा प्राधिकरणास बराच निधी वापरावा लागतो. दरवर्षी अंदाजे एक कोटी रुपये स्टेडियमच्या निगराणीसाठी खर्च येत असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने सध्या हे स्टेडियम कोविड-१९ निगा केंद्रासाठी आरक्षित केले आहे.

खासगी कार्यक्रमांद्वारे जास्त महसूल

गेली काही वर्षे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्‍घाटन आणि समारोप सोहळ्यास वापरले जाते. शिवाय राजकीय मेळावे, मैफली याव्यतिरिक्त व्यावसायिक प्रदर्शन आदींसाठी नियमित वापर होतो. याद्वारे गोवा क्रीडा प्राधिकरणास महसूल प्राप्त होतो. २०१४ पासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचा वापर क्रीडा स्पर्धांसाठी तुलनेत कमीच वापर झालेला आहे. प्राप्त माहितीनुसार, या स्टेडियमकडून सहा वर्षांत खासगी कार्यक्रमांद्वारे अंदाजे सात कोटी रुपये, तर क्रीडा स्पर्धाद्वारे सुमारे १७ लाख रुपयांच्या आसपास महसूल गोवा क्रीडा प्राधिकरणास मिळालेला आहे. गोव्यात होणारी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा मागील दोन वर्षे या स्टेडियममध्ये झालेली आहे. याव्यतिरिक्त काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा याठिकाणी झाल्या आहेत.

संबंधित बातम्या