आयएसएल शिल्ड विजेता संघ होणार ‘मालामाल’

साखळी फेरीअंती अव्वल स्थानी राहणाऱ्या लीग शिल्ड विजेत्या संघास 2021-22 मोसमापासून साडेतीन कोटी रूपये मिळतील.
आयएसएल शिल्ड विजेता संघ होणार ‘मालामाल’
ISL TrophyDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) स्पर्धेतील बक्षीस रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. साखळी फेरीअंती अव्वल स्थानी राहणाऱ्या लीग शिल्ड विजेत्या संघास 2021-22 मोसमापासून साडेतीन कोटी रूपये मिळतील. हाच संघ आयएसएल करंडक मानकरी ठरल्यास दुहेरी यशामुळे त्यांच्या तिजोरीत एकूण साडेनऊ कोटी रूपये जमा होतील. आयएसएल स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (FSDL) यांनी शुक्रवारी यंदाच्या स्पर्धेतील बक्षीस रकमेची माहिती दिली. स्पर्धा गोव्यात (Goa) खेळली जाईल. पहिला सामना 19 नोव्हेंबरला गतउपविजेता एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) व केरळा ब्लास्टर्स यांच्यात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) खेळला जाईल.

ISL Trophy
ISL 2021 : चेन्नईयीनच्या बचावफळीत रीगन कायम

‘लीग विनर्स शिल्ड’ला 2019-20 मोसमापासून सुरवात झाली. साखळी फेरीअंती अव्वल स्थानी राहणाऱ्या संघास मागील दोन मोसम 50 लाख रुपये मिळाले होते. आता त्यात तीन कोटी रूपयांची वाढ झाल्याने साखळी विजेत्या संघास साडेतीन कोटी रूपये मिळतील. लीग विनर्स शिल्ड संघ मागील दोन मोसमापासून प्रतिष्ठेच्या एएफसी चँपियन्स लीग (AFC Champions League) स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करतो. 2019-20 मोसमात एफसी गोवाने, तर 2020-21 मोसमात मुंबई सिटी एफसीने शिल्डचा मान मिळविला. गतमोसमात मुंबई सिटीने आयएसएल करंडक जिंकून दुहेरी यश प्राप्त केले होते. आयएसएल करंडक विजेत्या संघाला यंदापासून सहा कोटी रूपये मिळतील, अगोदर ही रक्कम आठ कोटी रुपये होती, तर आयएसएल उपविजेत्या संघाला पूर्वीच्या चार कोटी रूपयांऐवजी तीन कोटी रूपये मिळतील. उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना प्रत्येकी दीड कोटी रुपयांचा लाभ होईल.

आयएसएल 2021-22 बक्षीस रक्कम

- साखळी फेरीतील अव्वल लीग शिल्ड विजेत्यास 3.5 कोटी रुपये

- या संघाने आयएसएल करंडक जिंकल्यास एकूण 9.5 कोटी रुपये

- लीग शिल्ड विजेता आयएसएल उपविजेता ठरल्यास एकूण 6.5 कोटी रूपये

- साखळी फेरीतील अव्वल संघ तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी राहिल्यास एकूण 5 कोटी रूपये

- आगामी मोसमातील आयएसएल स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम 15.5 कोटी रुपये

Related Stories

No stories found.