प्रो-लीग फुटबॉलला विजेता मिळण्याची शक्यता कमी

dainik gomantak
सोमवार, 4 मे 2020

प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या भवितव्याबाबत जीएफएने अजून स्पष्ट संकेत दिलेले नाहीत, तसेच सहभागी क्लबांनाही निर्देश दिलेले नाहीत. प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३१ मेनंतर मोसम लांबवावा लागेल.

पणजी,

कोरोना विषाणू महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊन वाढल्यानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनला (जीएफए) प्रो-लीग स्पर्धा विजेत्याविनाच गुंडाळणे भाग पडू शकते. ३१ मेपर्यंत मोसम संपवायचा असल्याने, स्पर्धा संपविण्यासाठी आयोजकांपाशी पुरेसा वेळ नसेल.

प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या भवितव्याबाबत जीएफएने अजून स्पष्ट संकेत दिलेले नाहीत, तसेच सहभागी क्लबांनाही निर्देश दिलेले नाहीत. प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३१ मेनंतर मोसम लांबवावा लागेल. कोरोना विषाणू महामारीमुळे अखिल भारतीय भारतीय फुटबॉल महासंघाने मोसम अगोदरच संपुष्टात आणलेला आहे. ३१ मेपर्यंत सर्व स्पर्धा पूर्ण होणार नसल्याचे लक्षात आल्याने महासंघाने हा निर्णय घेतला आहे. आता लॉकडाऊन वाढल्यामुळे जीएफएही महासंघाच्याच पावलांवरून जाण्याची शक्यता आहे. प्रो-लीग स्पर्धेतील अजून १३ सामने बाकी आहेत.

गोवा प्रो-लीग स्पर्धेतील विजेता संघ अजून निश्चित झालेला नाही. स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ सध्या २० सामन्यांतून ४४ गुणांची कमाई करत अव्वल स्थानी आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत. चर्चिल ब्रदर्सविरुद्धचा सामना माजी विजेत्यांसाठी महत्त्वाचा आहे. फक्त एक सामना बाकी असलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबच्या खाती ४१ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाच सामने शिल्लक असलेल्या चर्चिल ब्रदर्स संघाते ३७ गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावरील साळगावकर एफसीचे २१ सामन्यांतून ३५ गुण, तर पाचव्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे १८ सामन्यांतून ३१ गुण झाले आहेत.

 

पदावनतीही रद्द शक्य

प्रो-लीग स्पर्धा पूर्ण न करता गुंडाळली, तर पदावनतीही रद्द होण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास यंदाचेच १२ संघ पुढील मोसमातील प्रो-लीगमध्ये खेळतील. सध्या वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब २० सामन्यांतून १५ गुण मिळवून तळाच्या १२व्या क्रमांकावर आहे. सेझा फुटबॉल अकादमीचे १८ सामन्यांतून १६ गुण असून ते ११व्या क्रमांकावर आहेत. कोअर ऑफ सिग्नल्स १९ सामन्यांतून १७ गुणांसह दहाव्या, तर वास्को स्पोर्टस क्लब २१ सामन्यांतून १९ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. प्रथम विभागीय स्पर्धा १ एप्रिलपासून खेळली जाणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे स्पर्धा सुरू होऊ शकली नाही आणि या मोसमात होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रो-लीगमध्ये पदोन्नती देण्याबाबत जीएफएसमोर समस्या नसेल.

 

संबंधित बातम्या