विजेत्याविना प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा

goa
goa

पणजी

गोवा फुटबॉल असोसिएशनची (जीएफए) २०१९-२० मोसमातील प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा विजेत्याविनाच राहण्याची दाट शक्यता आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे मागील मोसम अर्ध्यावर संपविण्याचे घोषित करून नव्या मोसमाच्या प्रक्रियेस सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

गोव्यात कोविड-१९ महामारी रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची साथ कधी आटोक्यात येईल याबाबत स्पष्टता नाही. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जीएफएचा वार्षिक मोसम सुरू होतो आणि त्यापूर्वी खेळाडू नोंदणी, तसेच इतर प्रक्रिया सुरू होतात. यंदा यापैकी काहीही झालेले नाही. कोरोना विषाणू महामारीमुळे गोव्यात अजून आंतरग्राम फुटबॉल स्पर्धाही सुरू झालेल्या नाहीत, ज्या दरमोसमात जून-जुलै महिन्यात खेळल्या जातात. गोव्यात फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यास सद्यःस्थिती अनुकूल नसल्याचे काही जीएफए पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोविड-१९ मुळे जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठकही होऊ शकलेली नाही, त्यामुळे विविध विषय फाईलबंद आहेत. संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची शेवटची बैठक २० जानेवारी रोजी झाली होती. कोविड परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच नवा फुटबॉल मोसम सुरू होणे अपेक्षित आहे.

मागील मोसम अर्ध्यावर आटोपून जीएफएने २०२०-२१ मोसमाची घोषणा केल्यास गतमोसमातील प्रो-लीग स्पर्धा विजेत्याविना राहील. २० मार्च २०२० नंतर गोव्यात एकही स्पर्धात्मक फुटबॉल सामना झालेला नाही. गोव्यातील अव्वल श्रेणी फुटबॉल स्पर्धा १९९८ पासून प्रो-लीग नावाने खेळली जाऊ लागली. तेव्हापासून प्रथमच ही स्पर्धा विजेत्याविना असेल. गतमोसमात प्रथम विभागीय स्पर्धाही होऊ शकलेली नाही, त्यामुळे नव्या मोसमात प्रो-लीगमध्ये पदोन्नतीचा संघ नसण्याचेही संकेत आहेत.

अपूर्ण असलेल्या यंदाच्या प्रो-लीग स्पर्धेत सध्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ ४४ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरील चर्चिल ब्रदर्सचे १७ सामन्यांतून ३७ गुण आहेत. पाच सामने बाकी असल्यामुळे ते सुद्धा विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. यामुळे गतमोसम अर्ध्यावर संपविताना प्रो-लीग विजेता जाहीर करणे योग्य ठरणार नाही असे जीएफएच्या प्रमुख धुरीणींना वाटते. अंतिम निर्णय जीएफएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत होईल. 

अर्ध्यावरील २०१९-२० प्रो-लीगमधील पहिले पाच संघ

संघ सामने विजय बरोबरी पराभव गुण

स्पोर्टिंग क्लब  २० १३ ५ २ ४४

धेंपो क्लब २१ ११ ८ २ ४१

चर्चिल ब्रदर्स १७ ११ ४ २ ३७

साळगावकर २१ ९ ८ ४ ३५

एफसी गोवा १८ ९ ४ ५ ३१

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com