Wrestlers Protest at Jantar Mantar: जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू अन् पोलिसांमध्ये धक्काबुक्की; गीता फोगाटचा भाऊही जखमी

जंतर-मंतरवर आंदोलनकर्ते कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बुधवारी रात्री झटापट झाल्याचे समोर आले आहे.
Wrestlers Protest
Wrestlers ProtestDainik Gomantak

Wrestlers Protest at Jantar Mantar: भारतातील स्टार कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप नेचे ब्रीजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला असून त्याचप्रकरणात न्याय मिळावा म्हणून भारतीय कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.

दरम्यान आंदोलनकर्त्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बुधवारी रात्री झटापट झाल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या अहवालानुसार पावसामुळे सर्वत्र पाणी झाल्याने कुस्तीपटूंनी बेड मागवले होते. पण ते बेड कुस्तीपटूंपर्यंत पोहचण्यापूर्वीच आडवण्यात आले.

यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये धक्काबुक्की झाल्याचे समजत आहे. तसेच दुष्यंत फोगाटबरोबरच आणखी दोन कुस्तीपटू यात जखमी झाले आहे.

तसेच फोल्डिंग बेड घेऊन येत असलेल्या आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. त्याचबरोबर या प्रकरणानंतर आता जंतर-मंतरवरील सुरक्षा आणखी वाढवली असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंमध्ये समावेश असलेला ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने या प्रकरणानंतर गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे.

Wrestlers Protest
Wrestlers Protest: नीरज चोप्राचा कुस्तीपटूंना खुला पाठिंबा! म्हणाला, 'त्यांना रस्त्यावर पाहून...'

बजरंगने आरोपही केला आहे की पोलिसांकडून आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना शिवीगाळ करण्यात आला, तसेच मारहाणही झाली. त्याने असेही म्हटले आहे की संपूर्ण देशातून आम्हाला पाठिंब्याची गरज आहे. याशिवाय कुस्तीपटूंनी काही बाहेरच्या लोकांनी दारुच्या नशेत गोंधळ घातल्याचाही आरोप केला आहे.

बंजरंगने गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात चार मागण्या केल्या आहेत. त्याने मारहाण प्रकरणाला जबाबदार अधिकाऱ्याविरोधात कारवाई व्हावी, आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्या गरजेच्या गोष्टी, जसे की वॉटरप्रुफ टेंट, मजबूत स्टेज, बेड, साऊंड सिस्टिम आणि प्रॅक्टिससाठी काही कुस्ती मॅट घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडावे आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांबरोबर आमच्या मागण्यांबद्दल लवकरात लवकर चर्चा करावी.

याशिवाय विनेश फोगाटने वरिष्ठ एसीबी धर्मेंद्र यांनी कुस्तीपटूंना धमकावल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने त्यांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप केला आहे. तसेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये विनेश रडतानाही दिसत आहे.

गीता फोगाटचा भावाला मारहाण झाल्याचा आरोप

भारताची कुस्तीपटू गीता फोगाटने या प्रकरणाबद्दल ट्वीट केले आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले आहे की 'जंतर-मंतरवर पोलिसांकडून कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या मारहाणीत माझा धाकटा भाऊ दुष्यंत फोगाटच्या डोक्याला मार लागला आहे आणखी एका कुस्तीपटूलाही मार लागला आहे. हे खूप लाजिरवाणे आहे.'

दरम्यान, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

पण आता आंदोलनाचे स्थळ सील करण्यात आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल आणि काँग्रेस नेते दिपेंद्र हुड्डा हे कुस्तीपटूंना भेटण्यासाठी आलेले असताना, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनीही दिली माहिती

या प्रकरणाबद्दल डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की जंतर-मंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती परवानगी शिवाय बेड घेऊन पोहचले होते.

पोलिसांनी त्यांना थांबवल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रकमधून बेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडे वाद झाले. ज्यानंतर सोमनाथ भारती आणि अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तसेच त्यांनी कुस्तीपटूंना तक्रार दाखल करण्याबद्दलही सांगितले. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून दुर्व्यवहार झाला, त्यांची वैद्यकिय तपासणीही करण्यात येईल, असेही सांगितले.

Wrestlers Protest
Wrestlers Protest: 'क्रिकेटर्सचे मौन का, घाबरतात का?', विनेश फोगटने विचारले तिखट प्रश्न

पी.टी. उषानेही घेतली भेट

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पी.टी उषा यांनी देखील बुधवारी दुपारी कुस्तीपटूंची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, संगीता फोगाट या महिला कुस्तीपटूंशी संवादही साधला. तसेच त्यांना या प्रकरणात शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे अश्वासनही दिले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की पी.टी. उशा यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर म्हटले होते की कुस्तीपटू बेशिस्तपणे हे आंदोलन करत आहेत. त्यानंतर आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com