महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणे अभिमानास्पद : शदाब

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणे अभिमानास्पद : शदाब
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणे अभिमानास्पद

पणजी: चेन्नई सुपर किंग्ज संघात असताना महेंद्रसिंह धोनी याच्या मार्गदर्शनाखाली खेळणे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया गोव्यातर्फे सर्वाधिक रणजी क्रिकेट बळी घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती याने दिली.

भारताचा यशस्वी कर्णधार धोनी आणि अष्टपैलू सुरेश रैना यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर ३९ वर्षीय जकातीने चेन्नई सुपर किंग्ज संघातील आपले माजी सहकारी धोनी आणि रैना यांच्या निवृत्तीसंदर्भात भावना व्यक्त केली. शदाब २००८ ते २०१३ या कालावधीत आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघात होता. धोनीच्या नेतृत्वाखाली तो चेन्नई संघातर्फे आयपीएल स्पर्धेत ५० सामने खेळला व त्याने ४५ विकेट्स प्राप्त केल्या आहेत. शिवाय शदाब चँपियन्स लीग स्पर्धेतही धोनीच्या नेतृत्वाखाली पाच सामने खेळला आहे. धोनी आणि रैना यांच्यासोबत खेळण्याबाबत आपण भाग्यशाली ठरलो आणि त्यांच्यासोबतचा प्रवास अविस्मरणीय ठरला आहे, असे शदाबने नमूद केले.

धोनी हा चँपियन नेता असून आयुष्यात एकदाच लाभणारा खेळाडू आहे, तर रैना हा अतिशय नम्र, सच्चा मित्र आणि निस्वार्थी क्रिकेटपटू असल्याचे शदाबने सांगितले. गुजरात लायन्स संघात असतानाही रैनासमवेत शदाब आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. देशासाठी धोनी आणि रैना यांनी बजावलेल्या स्पृहणीय कामगिरीबद्दल शदाबने त्यांचे आभारही मानले आहेत. 

आयपीएल स्पर्धेत शदाब चेन्नई सुपर किंग्जकडून २००८ ते २०१३ या कालावधीत, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून, तर गुजरात लायन्सतर्फे रैनाच्या नेतृत्वाखाली २०१६ व २०१७ मध्ये खेळला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com