पीएसजीची चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

मार्क्विन्हो, अँगेल डे मारियाच्या गोलमुळे पीएसजीने विश्रांतीस आघाडी घेतली आणि जुआन बेर्नाट याने उत्तरार्धात गोल करीत पीएसजीचा विजय निश्‍चित केला.

लिस्बन: नेमारच्या पीएसजीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना स्पर्धेतील सरप्राईज पॅकेज समजले जात असलेल्या आर. बी. लेपझिगची घौडदोड खंडित केली. नेमारच्या या पीएसजी संघाने त्याच्या पुरस्कर्त्यांनी सुरू केलेल्या लेपझिग संघास ३-० असे पराजित केले. 

मार्क्विन्हो, अँगेल डे मारियाच्या गोलमुळे पीएसजीने विश्रांतीस आघाडी घेतली आणि जुआन बेर्नाट याने उत्तरार्धात गोल करीत पीएसजीचा विजय निश्‍चित केला. आता स्थापनेचे ५० वे वर्ष चॅम्पियन्स लीग विजेतेपदाने साजरे करण्याचे पीएसजीचे लक्ष्य असेल. अवघ्या अकरा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या लेपझिग प्रथमच उपांत्य फेरीची लढत खेळत होते. पीएसजी चॅम्पियन्स लीग बाद फेरीत निष्प्रभ ठरले होते. मात्र पीएसजीने धक्कादायक निकाल लागणार नाही, याची काळजी घेतली. 

लेपझिगचे रेड बुल प्रवर्तक आहेत, तेच नेमारचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे नेमारच्या कामगिरीकडे जास्त लक्ष होते; पण त्याने एम्बापे आणि डे मारियाच्या साथीत लेपझिगवर सुरुवातीपासून दडपण ठेवले. लेपझिगचे लक्ष्य नेमारवर होते; पण त्याने अनेक चालींना चांगली सुरुवात करून दिली आणि निकाल स्पष्ट होत गेला. 

नेमार अंतिम सामन्यास अपात्र?
जर्सीची लेपझिग खेळाडूंसह अदलाबदल केल्यामुळे नेमार अंतिम सामन्यास मुकण्याची शक्‍यता आहे. कोरोना महामारीमुळे फुटबॉल लढतीबाबत अनेक निर्बंध आहेत. त्यात खेळाडूंना आपल्या जर्सीची अदलाबदल करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे नेमारवर कठोर कारवाई होऊ शकेल, अशी धास्ती पीएसजी चाहत्यांना वाटत आहे. आता कोरोनानंतर फुटबॉल सुरू करताना खेळाडूंना नियमांचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता नेमारला कदाचित १४ दिवसांच्या विलगीकरणाबाबत सूचना दिली जाण्याचीही शक्‍यता वर्तवली जात आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या