तिरंदाजांचे शिबिर २५ ऑगस्टपासून पुण्यात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

ऑलिंपिकची संधी असलेल्या स्पर्धकांचाच सराव, १६ खेळाडूंची निवड

मुंबई: भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठीच शिबिरांना परवानगी देण्याचे ठरवले आहे, त्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजांचे शिबिर सुरू होताना केवळ रिकर्व्ह तिरंदाजांनाच निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी एकंदर १६ तिरंदाज या शिबिरात सहभागी होतील.

‘गोमन्तक’ने काही दिवसांपूर्वी भारताच्या तिरंदाजांचे ऑलिंपिक सराव शिबिर पुण्यात होणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानुसारच निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाने घेतला आहे. या शिबिरासाठी निवडलेले तिरंदाज २५ ऑगस्टला पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेत दाखल होतील. कोरोना चाचणीनंतर त्यांना १५ दिवस विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतरच त्यांचा सराव होणार आहे असे वृत्त आहे.

पुण्यातील लष्कर क्रीडा संस्थेतच तिरंदाजांची निवास व्यवस्था असेल. हा परिसर कमालीचा सुरक्षित विभाग आहे. त्यामुळे हे सरावाचे ठिकाण जैवसुरक्षित आहे. या संस्थेच्या नियमानुसार या ठिकाणी महिलांची निवास व्यवस्था करता येत नाही; मात्र तो प्रश्‍न आता सोडवण्यात आला असल्याचे संकेत मिळत आहेत. या ठिकाणी काही आठवड्यांपासून तरुणदीप राय, अतानु दास आणि प्रवीण जाधव हे लष्करातील नेमबाज सराव करीत आहेत.

पुण्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्यामुळे जमशेदपूर, दिल्ली तसेच रांचीचा विचार केला जात होता, पण लष्करी क्रीडा संस्थेची सुरक्षा काटेकोर असल्यामुळे त्याच ठिकाणी अखेर शिबिर घेण्याचे ठरले असल्याचे संकेत देण्यात आले होते. 

शिबिरातील तिरंदाज- पुरुष ः तरुणदीप राय, अतानू दास, बी धीरज, प्रवीण जाधव, जयंत तालुकदार, सुखमणी बाबरेकर, कपिल, विश्‍वास. महिला ः दीपिका कुमारी, अंकिता भकत, एल. बॉम्बयला देवी, रिधी, मधू वेदवान, हिमानी, प्रमिला बारिया, त्रिशा संचेती. चार मार्गदर्शक तसेच दोन सपोर्ट स्टाफ.

संबंधित बातम्या