नवीन वर्षात थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धांना पी व्ही सिंधू मुकणार?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 डिसेंबर 2020

इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने पी. व्ही. सिंधूचा नव्या वर्षात होणाऱ्या थायलंडमधील तीन स्पर्धातील सहभाग अनिश्‍चित झाला आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या प्रवास निर्बंधामुळे सिंधूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली- इंग्लंडमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने पी. व्ही. सिंधूचा नव्या वर्षात होणाऱ्या थायलंडमधील तीन स्पर्धातील सहभाग अनिश्‍चित झाला आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या प्रवास निर्बंधामुळे सिंधूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. सिंधू मात्र इंग्लंडहून थायलंडला विमानसेवा सुरू असल्याने स्पर्धेत खेळण्याची आशा बाळगून आहे. 

जानेवारीत बॅंकॉकमध्ये दोन थायलंड ओपन तसेच जागतिक मालिकेतील अंतिम टप्प्याची स्पर्धा आहे. यातील पहिली स्पर्धा १२ जानेवारीपासून आहे. त्यापूर्वीचे विलगीकरण पूर्ण करण्यासाठी सिंधूला बॅंकॉकला ३ जानेवारीपर्यंत दाखल व्हावे लागणार आहे. ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध घालणाऱ्या देशात सातत्याने वाढ होत आहे. 

मी जानेवारीच्या सुरुवातीस प्रवास करणार आहे. सध्या तरी ब्रिटनहून थायलंडला जाण्यासाठी कोणतेही प्रतिबंध नाहीत. मी दोहामार्गे थायलंडला जाण्याचा विचार करीत आहे, असे सिंधूने सांगितले. सिंधूने आहार आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ऑक्‍टोबरमध्ये इंग्लडमधील गॅतोरेड इन्स्टिट्यूटमध्ये सराव करण्याचे ठरवले. ती टॉबी पेंटी आणि राजीव जोसेफ यांच्यासह सराव करीत आहे. मी सराव करीत असलेल्या नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये जैवसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे. त्यामुळे माझ्या सरावात कोणताही खंड पडलेला नाही, असे सिंधूने सांगितले. 

थायलंड स्पर्धेबाबत संभ्रम

थायलंडमध्ये तीन स्पर्धा लागोपाठ घेण्याचे बॅडमिंटन महासंघाने ठरवले आहे; पण सध्याची बॅंकॉकमधील परिस्थिती स्पर्धेस पोषक नाही. थायलंडमध्ये शनिवारी ५४८ कोरोनारुग्ण आढळले. त्यातील बहुसंख्य बॅंकॉकपासून ३४ किलोमीटरवरील सामुत साखून परगण्यातील आहेत. 

संबंधित बातम्या