R D Mangeshkar: आर. डी. मंगेशकर यांच्या निवडीने गोव्यात 'तायक्वांदो'ला न्याय मिळणार!

गोव्यासाठीआंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणारा पी. आनंद गुजरातमध्ये काम करतो
R D Mangeshkar
R D MangeshkarDainik Gomantak

पणजी : Taekwondo Federation of India दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय तायक्वांदो महासंघाची (तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया) निवडणूक दिल्ली येथे झाली. त्यात गोव्याचे ॲड. आर. डी. मंगेशकर सचिवपदी निवडून आले. तमिळनाडूचे डॉ. आयशरी के. गणेश यांची अध्यक्षपदी निवड झाली.

(R D Mangeshkar of Goa has been elected as the secretary of Taekwondo Federation of India)

महासंघाची निवडणूक प्रक्रिया आणि निकालाची माहिती ॲड. मंगेशकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी दिल्लीतील ऑलिंपिक भवनात 14 नोव्हेंबर रोजी निवृत्त न्यायाधीश जी. एस. सिस्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाची निवडणूक झाली.

भारतीय ऑलिंपिक संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा निरीक्षकही निवडणुकीस उपस्थित होता, अशी माहिती मंगेशकर यांनी दिली. ‘‘महासंघाच्या मान्यतेसाठी न्यायालयात बरीच वर्षे लढावे लागले. न्याय मिळाला, त्यामुळे गेली काही वर्षे जो वाद होता, तो आता निकालात निघाला आहे,’’ असे मंगेशकर म्हणाले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. आयशरी के. गणेश यांनी गुजरातचे संजय शेरपुरिया यांचा 38-30 मतफरकाने पराभव केला, सचिवपदी निवडून येताना ॲड. मंगेशकर यांनी ॲड. प्रभातकुमार शर्मा यांना 41-27 मतफरकाने हरविले. खजिनदारपदासाठी हरियानाच्या जसबीरसिंग गिल यांनी जम्मू-काश्मीरच्या अतुल पंगोत्रा यांना 38-29 असे पराजित केले. महासंघाची कार्यकारी समिती 18 सदस्यीय आहे. समिती 2022 ते 2026 या कालावधीसाठी आहे.

मंगेशकर यांचे तायक्वांदोत भरीव कार्य

ॲड. आर. डी. (राजू) मंगेशकर यांनी गोवा तायक्वांदो संघटनेचे पदाधिकारी या नात्याने भरीव योगदान दिले आहे. 1994 पासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोवा तायक्वांदोत सातत्याने पदके जिंकत आहे. केरळमध्ये झालेल्या 35 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत तायक्वांदोत गोव्याने एकूण 11 सुवर्ण, 8 रौप्य व 16 ब्राँझपदके जिंकली.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तायक्वांदो खेळाचा समावेश होता, परिणामी गोव्याची पदकसंख्या घटली. ‘‘गोव्यात आम्ही तायक्वांदोची प्रगती साधली. असे योगदान आता महासंघाचा सचिव या नात्याने करण्याचे उद्दिष्ट आहे,’’ असे मंगेशकर म्हणाले.

गोव्यात खेळाला मिळाली अयोग्य वागणूक

महासंघाचा वाद सुरू असताना, गोव्यात या खेळाची समांतर संघटना नव्हती, तरीही राज्यात तायक्वांदो खेळास राज्य सरकारकडून अयोग्य वागणूक मिळाली, अशी खंत ॲड. मंगेशकर यांनी व्यक्त केली. त्याचा फटका राज्यातील तायक्वांदोपटूंना बसला.

न्यायालयाच्या आदेशानंतर महासंघाची निवडणूक झाली आहे, आता खेळास न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गोव्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कित्येक पदके जिंकणारा पी. आनंद गुजरातमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतो, आवश्यक पात्रता असूनही गोव्यात त्याच्या कामगिरीची दखल घेण्यात आलेली नसल्याबद्दल मंगेशकर यांनी खेद व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com