विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याची विराटला आणि कंपनीला संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

बाद फेरीसाठी आशा कायम ठेवायच्या असतील तर उर्वरित सहाही सामने जिंकणे आवश्‍यक आहे, त्यामुळे उद्या त्यांच्याकडून जोरदार खेळ अपेक्षित आहे. हा सामना जिंकला तर चौथ्या क्रमांकावर प्रगती करता येईल याची जाणीव राजस्थानच्या खेळाडूंना आहे.

दुबई- फॉर्मात आलेल्या एबी डिव्हिल्यर्सला चौथ्याऐवजी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्याचा निर्णय अंगलट आलेल्या विराट कोहलीला उद्या विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करण्याची संधी आहे. राजस्थान रॉयल्स सध्या सातव्या स्थानावर असले तरी बंगळूर संघासाठी ही लढत सोपी नसेल.

सलग दोन शानदार विजय मिळवून बंगळूरने आयपीएल गुणतक्क्यात तिसरे स्थान मिळवले आहे, परंतु पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांचे काही डावपेच चुकले होते. या चुका उद्या सुधारल्या जाऊ शकतील, परंतु राजस्थानचा संघही तेवढाच निष्णांत खेळाडूंनी भरलेला आहे.

बेन स्टोक्‍स, जॉस बटलर, स्टीव स्मिथ, संजू सॅसमन आणि उदयास आलेला राहुल तेवतिया आणि जोफ्रा आर्चर असे किमान सहा मॅचविनर राजस्थान संघात आहेत, पण त्यांची एकत्रित कामगिरी ठराविक सामन्यातच झाल्याने त्यांचा संघ सातवा आहे. बाद फेरीसाठी आशा कायम ठेवायच्या असतील तर उर्वरित सहाही सामने जिंकणे आवश्‍यक आहे, त्यामुळे उद्या त्यांच्याकडून जोरदार खेळ अपेक्षित आहे. हा सामना जिंकला तर चौथ्या क्रमांकावर प्रगती करता येईल याची जाणीव राजस्थानच्या खेळाडूंना आहे.

दुबईतील हा सामना दुपारी होणार असल्यामुळे संघ प्रथम फलंदाजीस प्राधान्य देतील. खेळपट्टी संथ असली तरी दुसऱ्या डावात आव्हानाचा पाठलाग करणे कठीण नाही हे कालच्या सामन्यातून पंजाबने दाखवले आहे.
                             

लक्षवेधक 

  •     अखेरच्या षटकात धावगतीस वेग देण्यासाठी बंगळूर एबी डिव्हिल्यर्सवर अवलंबून 
  •      ॲरॉन फिंचच्या काहीशा कूर्मगती फलंदाजीमुळे बंगळूर डावावर दडपण
  •     राजस्थान+ गोलंदाजी जास्त प्रभावी, त्यामुळे बंगळूरसमोर खडतर आव्हान
  •     राजस्थानची -०.८४४ ही धावगती स्पर्धेतील सर्वात खराब, त्यामुळे आव्हान खडतर
  •     सलामीच्या स्टोक्‍सला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार, ज्याद्वारे धावगतीस वेग       देता येईल.

संबंधित बातम्या