राजस्थान रॉयल्स संघातील क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांना कोरोना

.
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

आयपीएलला रवाना होण्यापूर्वी पहिला धक्का

नवी दिल्ली: बहुचर्चित आयपीएलच्या तयारीची लगीनघाई सुरू होत असतानाच माशी शिंकली. राजस्थान रॉयल्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या आयपीएलसाठी पुढील आठवड्यापासून एकेक संघ दुबईत जाण्याच्या तयारीत असतानाच हा पहिला धक्का बसला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे मायदेशातील आयपीएल अमिरातीत खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे; पण तेथे जाण्यापूर्वीच पहिले निदान झाले आहे. क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याज्ञिक कोरोनाबाधित झाल्याचे राजस्थान रॉयल्स संघाने पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

दुबईस जाण्यासाठी राजस्थानचा संघ मुंबईत एकत्रित होणार आहे आणि त्याच पार्श्‍वभूमीवर ही चाचणी करण्यात आली, असे स्पष्ट करून पुढे म्हणण्यात आले आहे, संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आम्ही अतिरिक्त चाचणी करणार आहोत. बीसीसीआयने दोन चाणण्या अनिवार्य केल्या आहेत; परंतु आम्ही एकूण तीन चाचण्या करणार आहोत.

खेळाडू संपर्कात नाही
आयपीएलसाठी जाणाऱ्या संघातील कोणताही खेळाडू याज्ञिक यांच्या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे राजस्थान रॉयल्स संघाकडून स्पष्ट करण्यात आले. याज्ञिक २५ आयपीएल सामन्यांतही खेळलेले आहेत.

संबंधित बातम्या