Ranji Trophy : गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानची घसरगुंडी

ऑफस्पिनर मोहित रेडकर, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची चमकदार कामगिरी
Ranji Trophy Goa Vs Rajasthan
Ranji Trophy Goa Vs RajasthanDainik Gomantak

Ranji Trophy Goa Vs Rajasthan : गोव्याचा ऑफस्पिनर मोहित रेडकर (3-46) व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर (2-77) यांनी रणजी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानानंतर अचूकतेवर भर देत शानदार मारा केला. त्यामुळे राजस्थानची घसरगुंडी उडाली व गोव्याला सामन्यावर वर्चस्व राखता आले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर गोव्याने गुरुवारी सकाळी पहिला डाव कालच्या 8 बाद 493 धावांवरून 9 बाद 547 धावांवर घोषित केला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर राजस्थानने पहिल्या डावात 6 बाद 245 धावा केल्या होत्या. ते अजून 302 धावांनी मागे असून फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 153 धावा करणे आवश्यक आहे. सामन्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.

Ranji Trophy Goa Vs Rajasthan
Sonali Phogat च्या अधुऱ्या चित्रपटाची संपूर्ण कहानी, आरोपपत्रात 'हे' महत्त्वाचे खुलासे

गोव्याचे सामन्यात कमबॅक

राजस्थाननेही गोव्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. चहापानाला खेळ थांबला तेव्हा पाहुणा संघ 2 बाद 190 असा सुस्थिती होता. मात्र नंतर अर्जुन व मोहितच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 6 बाद 223 असा गडगडला. अर्जुनने तिसऱ्या स्पेलमध्ये 6-1-18-2 असे, तर मोहितने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये 5-1-15-2 असे पृथक्करण राखले. जम बसलेल्या महिपाल लोमरोर (63) याला अर्जुनने यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्याकरवी झेलबाद केले. नंतर पुन्हा अर्जुन व एकनाथ यांचा समन्वय जमून आला आणि सलमान खान (40) याला माघारी परतावे लागले. लगेच डावातील 64व्या षटकात मोहितने राजस्थानला आणखीनच संकटात टाकले. अनुभवी कर्णधार अशोक मेणारियाला याला त्याने यष्टिरक्षक केरकर याच्याकरवी यष्टीचीत केले, तर चार चेंडूंनंतर कमलेश नगरकोटी याला त्रिफळाचीत बाद केले. चेंडू खेळावा की नको या संभ्रमावस्थेत कमलेश भांबावला.

यश कोठारीचे शतक हुकले

राजस्थानला डावातील पहिला झटका विचित्रपणे बसला. लक्षय गर्ग याच्या गोलंदाजीवर यश कोठारी स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारला जो गोलंदाजाच्या हाताला लागून यष्ट्यांना लागला, बेल्स उडाल्या तेव्हा दुसरा सलामीवीर अभिजित तोमर याने क्रीझ सोडली होती. त्यानंतर यश व महिपाल यांची जोडी जमली. मात्र 27 वर्षीय यश याला पहिले रणजी शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने मारलेला फटका फॉरवर्ड शॉर्टलेगवरील सुमीरन आमोणकरला आपटून वर उडाला व बदली क्षेत्ररक्षक दीपराज गावकर याने मिडविकेटला सोपा झेल पकडला. गोव्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढविलेल्या आक्रमक शैलीतील यश याने 93 चेंडूंत 17 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 96 धावा केल्या. त्याने महिपाल याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 174 षटकांत 9 बाद 547 (मोहित रेडकर 28, लक्षय गर्ग नाबाद 25, अराफात खान 3-105).

राजस्थान, पहिला डाव : 71 षटकांत 6 बाद 245 (यश कोठारी 96, अभिजित तोमर 9, महिपाल लोमरोर 63, सलमान खान 40, अशोक मेणारिया 12, कुणालसिंग राठोड नाबाद 20, कमलेश नगरकोटी 0, शुभम शर्मा नाबाद 2, लक्षय गर्ग 14-2-43-0, अर्जुन तेंडुलकर 14-2-77-2, मोहित रेडकर 23-7-46-3, ऋत्विक नाईक 10-2-31-0, दर्शन मिसाळ 10-1-46-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com