रणजीसाठी संघाचे तंदुरुस्ती शिबिर सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गोव्याच्या संभाव्य रणजी संघाचे तंदुरुस्ती शिबिर सुरू झाले असून तंदुरुस्ती प्रशिक्षक अर्जुन बासू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू मेहनत घेत आहेत. कोविड-१९ विषयक मार्गदर्शक शिष्टाचार पाळून शिबिर सुरू असल्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी सांगितले.

पणजी  : गोव्याच्या संभाव्य रणजी संघाचे तंदुरुस्ती शिबिर सुरू झाले असून तंदुरुस्ती प्रशिक्षक अर्जुन बासू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू मेहनत घेत आहेत. कोविड-१९ विषयक मार्गदर्शक शिष्टाचार पाळून शिबिर सुरू असल्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी सांगितले.

जीसीएने संभाव्य संघातील २९ खेळाडूंची गतआठवडाअखेरीस कोविड-१९ चाचणी घेतली होती, त्यात सारे खेळाडू निगेटिव्ह ठरले. नंतर दाखल झालेला बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याची चाचणीही निगेटिव्ह आहे. संभाव्य संघातील ३१वा खेळाडू हर्षद गडेकर आजारपणामुळे चाचणी देऊ शकला नव्हता, त्याची चाचणी एक-दोन दिवसात होईल, असे मयेकर यांनी सांगितले. संघाचे मुख्य प्रशिक्षक कर्नाटकचे दोड्डा गणेश शुक्रवारी गोव्यात दाखल झाले. कोविडविषयक आवश्यक शिष्टाचाराची पूर्तता केल्यानंतर येत्या आठवड्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिर घेण्याचे नियोजन असल्याचे मयेकर यांनी नमूद केले.

तंदुरुस्ती प्रशिक्षक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीत विविध गटात खेळाडूंचे सत्र चालते. सध्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर जास्त भर देण्यात आला आहे. एका गटात पाच खेळाडू या पद्धतीने सत्र व्यवस्थित सामाजिक अंतर राखून घेतले जाते. सराव सत्र संपल्यानंतर खेळाडू आपापल्या घरी विलगीकरण पाळतात, अशी माहिती मयेकर यांनी दिली.

संबंधित बातम्या