Ranji Trophy: 'या' दोन संघात रंगणार फायनलचा मुकाबला, जाणून घ्या कधी होणार मॅच

रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेसाठी अंतिम सामना खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत.
Ranji Trophy 2022-23
Ranji Trophy 2022-23Dainik Gomantak

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामने संपले असून आता अंतिम सामना खेळणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. या रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत बंगाल आणि सौराष्ट्र संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

आता बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तीन वर्षात दुसऱ्यांदा बंगाल आणि सौराष्ट्र संघात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार आहे. 2019-20 रणजी हंगामातही या दोन संघातच अंतिम सामना झाला होता. त्यावेळी सौराष्ट्रने बंगालचा पराभव केला होता. बंगालने यापूर्वी अखेरची रणजी ट्रॉफी 1989-90 च्या हंगामात जिंकली होती.

गेल्या पाच रणजी हंगामांचा विचार केला, तर सौराष्ट्र तिसऱ्यांदा आणि बंगाल दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळणार आहेत.

Ranji Trophy 2022-23
Ranji Trophy: ऐकावं ते नवलंच! चक्क राखेमुळे थांबला सामना, आर अश्विनच्याही कमेंटने वेधले लक्ष

बंगालचा मध्यप्रदेशवर विजय

बंगालने उपांत्य फेरीत गतविजेत्या मध्यप्रदेशला 306 धावांनी पराभूत करत अंतिम सामना गाठला आहे. या सामन्यात मनोज तिवारीच्य नेतृत्वातील बंगालने प्रथम फलंदाजी करताना 438 धावा उभारल्या होत्या. सुदीप कुमार घरामी आणि अनुस्तुप मुजुमदार यांनी अनुक्रमे 112 आणि 120 धावांची शतकी खेळी केली होती. तर मध्यप्रदेशकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मध्यप्रदेशला पहिल्या डावात केवळ 170 धावाच करता आल्या. त्यामुळे बंगालने 268 धावांची मोठी आघाडी घेतली. मध्यप्रदेशकडून सारांश जैनने 65 आणि शुभम शर्माने नाबाद 44 धावा केल्या, या दोघांव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला फार काही करता आले नाही. बंगालकडून आकाश दीपने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

Ranji Trophy 2022-23
IND vs PAK: स्मृती मानधनाच्या जागेवर कोणाला मिळणार संधी? अशी असेल टीम इंडियाची Playing XI

बंगालने दुसऱ्या डावात सर्वबाद 279 धावा केल्या. या डावातही सुदीप कुमार घरामी (41) आणि अनुस्तुप मुजुमदार (80) यांनी चांगला खेळ केला. तसेच प्रदिप्ता प्रामाणिक यानेही 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. मध्यप्रदेशकडून सारांश जैनने 6 विकेट्स घेतल्या. दरम्यान बंगालने पहिल्या डावातील आघाडीसह मध्यप्रदेशसमोर 548 धावांचे आव्हान ठेवले.

पण, 548 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्यप्रदेशचा संघ अखेरच्या दिवशी 241 धावांवर सर्वबाद झाला. मध्यप्रदेशकडून केवळ रजत पाटिदारलाच 52 धावांची अर्धशतकी खेळी करता आली. बाकी कोणी विशेष कामगिरी करू शकले नाहीत. बंगालकडून या डावात प्रदिप्ता प्रमाणिक याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

सौराष्ट्राचा कर्नाटकवर विजय

सौराष्ट्राने उपांत्य फेरीत कर्नाटकला अटीतटीच्या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मयंक अगरवालच्या 249 धावांच्या द्विशतकाच्या जोरावर सर्वबाद 407 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रकडून या डावात चेतन साकारिया आणि कुशांग पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सौराष्ट्रने कर्नाटकला चोख प्रत्युत्तर देताना सर्वबाद 527 धावा उभारल्या. सौराष्ट्रकडून पहिल्या डावात कर्णधार अर्पित वसवडाने 202 धावांची खेळी केली. तसेच त्याला शेल्डन जॅक्शनची शानदार साथ मिळाली. शेल्डन जॅक्सनने 160 धावांची खेळी केली. कर्नाटककडून विद्वथ कवेरप्पा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

Ranji Trophy 2022-23
IND vs AUS: केएल राहुलच्या फ्लॉप शो वर चिडला व्यंकटेश प्रसाद; 'काही भाग्यवान असतात, तर...'

पहिल्या डावात 120 धावांनी पिछाडीवर पडलेल्या कर्नाटकचा दुसरा डाव 234 धावात आटोपला. त्यामुळे त्यांना सौराष्ट्रसमोर केवळ 115 धावांचे माफक आव्हान ठेवता आले. कर्नाटककडून दुसऱ्या डावात निकीन जोसने 109 धावांची शतकी खेळी केली, तर मयंक अगरवालने 55 धावा केल्या. तसेच सौराष्ट्रकडून चेतन साकारिया आणि धर्मेंद्र सिंग जडेजाने सर्वाधिक प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, 115 धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्राचाही कस लागला. पण त्यांनी 35 व्या षटकात 6 विकेट्स गमावत 117 धावा करत विजय निश्चित केला. सौराष्ट्रकडून या डावातही कर्णधार अर्पितने सर्वाधिक नाबाद 47 धावांची खेळी केली. कर्नाटकडून कृष्णप्पा गॉथम आणि वासूकी कौशिक यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com