Ranji Trophy : केरळच्या 'या' फिरकी गोलंदाजाचा गोव्याला धोका

दोन्ही संघांचा आजपासून स्पर्धेतील चौथा सामना
Cricket
CricketDainik Gomantak

Ranji Trophy : मूळ मध्य प्रदेशचा, पण गेली काही वर्षे केरळकडून खेळणारा फिरकी गोलंदाज जलज ससक्सेना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत क गटातील तीन सामन्यांत या 36 वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत 26 विकेट टिपल्या आहेत. सध्या तो मॅचविनर गोलंदाज आहे.

यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा चौथा सामना मंगळवारपासून (ता. 3) केरळमधील थुम्बा येथे खेळला जाईल. त्यावेळी यजमान संघाच्या फिरकी माऱ्याचा धोका गोव्यासमोर असेल. पाच डावांत 91.75च्या सरासरीने 367 धावा केलेला सुयश प्रभुदेसाई व तळाच्या फलंदाजांसह खेळताना कर्णधार दर्शन मिसाळच्या 73.33च्या सरासरीने 220 धावा वगळता गोव्याची फलंदाजी अजून अपेक्षेनुसार बहरलेली नाही.

Cricket
Baina : पुरोहित मारहाण प्रकरण! पोलिस आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडताहेत; विश्व हिंदू परिषद

गोव्याचे गोलंदाज स्पर्धेत विशेष प्रभावी ठरलेले नाहीत. फिरकीपटू मोहित रेडकरच्या 10 विकेट व दर्शन मिसाळच्या 8 विकेट वगळता गोव्याच्या गोलंदाजीत विशेष दम दिसलेला नाही. डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकरने 6 गडी बाद केले आहेत, पण त्याची 45.50 इतकी महागडी आहे. लक्षय गर्गला अजून दिशा व टप्पा गवसलेला नाही. प्रत्येकी एक सामना खेळलेले ऋत्विक नाईक, शुभम देसाई व फेलिक्स आलेमाव प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे केरळचे अनुभवी फलंदाज गोव्यावर वर्चस्व गाजवू शकतात. अगोदरच्या लढतीत प्रतिस्पर्धी फलंदाज गोव्याच्या गोलंदाजांना भारी ठरले आहेत.

संघात बदल शक्य

मागील तीन सामन्यांत गोव्याचे सलामीचे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले आहेत. सुमीरन आमोणकरने 22च्या सरासरीने 110, तर अमोघ देसाईने 20.80च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत. दोघेही जम बसल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. मैदानावरील अशोभनीय वर्तनामुळे सुमीरनवर दोन सामन्यांत कारवाईही झालेली आहे. केरळविरुद्ध सलामी जोडीत बदल दिसू शकतो. तसे झाल्यास ईशान गडेकरला पदार्पणाची संधी मिळेल. खेळपट्टीचा कल फिरकी गोलंदाजीच्या बाजूने असल्यास शुभम देसाई संघातील तिसरा फिरकी गोलंदाज असेल व त्यामुळे फेलिक्स आलेमावला संघाबाहेर जावे लागेल.

Cricket
Manohar International Airport : प्रतिक्षा संपली! 5 जानेवारीला मनोहर विमानतळावर पहिलं लॅन्डींग

केरळ बाद फेरीसाठी प्रयत्नशील

केरळने तीन सामन्यांतून 13 गुण प्राप्त केले आहेत. मागील लढतीत त्यांनी थुम्बा येथे छत्तीसगडला सात विकेट राखून हरविले. त्या लढतीत जलज सक्सेना याने दोन्ही डावांत मिळून 11 गडी बाद केले. त्यापूर्वी रांची येथे झारखंडला 85 धावांनी हरविले, तर राजस्थानविरुद्धचा सामना जयपूर येथे अनिर्णित राहिला. गोव्याविरुद्ध विजय नोंदविल्यास केरळचा बाद फेरी गाठण्याचा दावा प्रबळ होईल.

गोव्याविरुद्ध धावांचा डोंगर

गोव्याचे तिन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत, त्यापैकी दोन लढतीत त्यांना पहिल्या डावात पिछाडीवर राहावे लागले. गोव्याचे सध्या पाच गुण आहेत. कर्नाटकने मागील लढतीत पर्वरी येथे धावांचा डोंगर रचताना 7 बाद 603 धावांवर डाव घोषित केला होता. मात्र गोव्यावर फॉलोऑन लादूनही कर्नाटकला सामना जिंकता आला नव्हता. गोव्याविरुद्ध राजस्थानने 456 धावा केल्या, तर झारखंडने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com