गोव्याचे संभाव्य रणजीपटू कोविड ‘निगेटिव्ह'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

  गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) रणजी क्रिकेट संघ तयारीची प्रक्रिया सुरू करताना संभाव्य खेळाडूंची कोविड-१९ चाचणी केली, त्यात २९ खेळाडू निगेटिव्ह असल्याची माहिती जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी शुक्रवारी दिली.

पणजी :  गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) रणजी क्रिकेट संघ तयारीची प्रक्रिया सुरू करताना संभाव्य खेळाडूंची कोविड-१९ चाचणी केली, त्यात २९ खेळाडू निगेटिव्ह असल्याची माहिती जीसीएचे क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी शुक्रवारी दिली.

यशस्वी प्रशिक्षक माजी कसोटीपटू दोड्डा गणेश यांना जीसीएने संघ प्रशिक्षकपदी कायम राखले असून चेन्नईचे अर्जुन बासू हे नवे तंदुरुस्ती प्रशिक्षक (ट्रेनर) असतील. भारतीय क्रिकेट संघाचे माजी तंदुरुस्ती प्रशिक्षक बासू शंकर यांचे अर्जुन पूत्र आहेत. गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २०१९-२० मोसमात प्लेट गटात अव्वल राहत रणजी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. गोव्याचा रणजी क्रिकेट संघ आतापर्यंत गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली चार मोसम खेळला आहे, त्यात २९ पैकी ११ सामन्यांत विजय नोंदविला आहे.

मयेकर यांनी सांगितले, की जीसीएने खासगी वैद्यकीय सेवेद्वारे संभाव्य रणजीपटूंची कोविड-१९ चाचणी केली. त्या चाचणीतील सर्व २९ खेळाडू निगेटिव्ह ठरले. बंगालचा अशोक डिंडा याला कोलकात्याहून गोव्यात विमानाने येण्यास उशीर झाला, त्यामुळे त्याची चाचणी होऊ शकली नाही. त्याची चाचणी होणे बाकी आहे. हर्षद गडेकर आजारी असल्याने त्याने कोविड चाचणीस उपस्थिती लावली नाही. कर्नाटकचा अमित वर्मा आणि मुंबईचा एकनाथ केरकर या पाहुण्या क्रिकेटपटूंची चाचणीही निगेटिव्ह आली. सराव शिबिर सुरू झाल्यानंतर गणेश बंगळूरहून दाखल होतील. तेव्हा त्यांचीही चाचणी होईल.

आगामी २०२०-२१ मोसमातील रणजी करंडक स्पर्धेनिमित्त जीसीएने ३१ सदस्यीय संभाव्य संघ जाहीर केला आहे. मयेकर यांनी सांगितले, की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रणजी संघाच्या सराव शिबिरास सुरवात अपेक्षित आहे. शिबिराच्या प्रारंभी सर्व खेळाडूंची रक्त चाचणी होईल, तसेच ट्रेनर बासू यांच्या निर्देशानुसार तंदुरुस्ती चाचणीही होईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जानेवारीपासून रणजी क्रिकेट मोसम सुरू करण्याचे सुतोवाच केले आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे यंदाची रणजी करंडक स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात होण्याचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या