
Ranji Trophy: साथ देणाऱ्या खेळपट्टीवर छत्तीसगडच्या फलंदाजांनी दिवसभरातील दोन सत्रात गोलंदाजांवर वर्चस्व राखले, मात्र अखेरच्या सत्रात गोव्याने मुसंडी मारत तीन गडी बाद करण्यात यश मिळविले, त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचे एकूण चार गडी बाद केल्याचे समाधान लाभले.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा छत्तीसगडने 4 गडी गमावून 273 धावा केल्या. तीन वर्षांनंतर रणजी स्पर्धेत पुनरागमन केलेल्या सलामीच्या शशांक चंद्रकार याने शतक ठोकले.
छत्तीसगडने पहिल्या दोन सत्रात चहापानापर्यंत 61 षटकांत 1 गडी गमावून 206 धावा केल्या, मात्र त्यानंतरच्या सत्रात गोव्याने 27 षटकांत 67 धावा देत 3 गडी बाद करण्यात यश मिळविले.
कमी प्रकाशामुळे दिवसभरातील निर्धारित षटकांपैकी दोन षटके अगोदर खेळ लवकर थांबविण्यात आला.
गोव्याने सेनादलाविरुद्ध विजय नोंदविलेल्या संघात एक बदल केला. धावांसाठी संघर्ष केलेल्या सिद्धेश लाड याची जागा दीपराज गावकर याने घेतली. जानेवारी 2015 नंतर त्याला कारकिर्दीतील चौथा रणजी सामना खेळण्याची संधी लाभली.
शतकी भागीदारी
छत्तीसगडला शशांक चंद्रकार व अनुज तिवारी यांनी 163 धावांची भक्कम सलामी दिली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा या जोडीने 115 धावांची भागीदारी केली होती. त्यापूर्वी धाव घेताना गोंधळ उडालेला असताना दोन्ही फलंदाज एकाच टोकाला होते.
परंतु गोव्याला धावबाद करण्याची संधी साधता आली नाही. शतकाच्या वाटेवर असलेल्या अनुजला वेगवान विजेश प्रभुदेसाई याने यष्टिरक्षक एकनाथ केरकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अनुजने 131 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.
कारकिर्दीतील पहिले शतक
चहापानानंतर शशांक याने वैयक्तिक तिसऱ्या रणजी सामन्यातील पहिले शतक साजरे केले. जानेवारी 2020 नंतर प्रथमच रणजी सामन्यात खेळणाऱ्या शशांकने 101 धावा केल्या.
विजेशच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये सुयश प्रभुदेसाईने अप्रतिम झेल पकडल्यामुळे त्याची खेळी संपुष्टात आली. 191 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार व एक षटकार मारला.
अर्धशतकानंतर लगेच आशुतोष सिंग याला लक्षय गर्गने त्रिफळाचीत बाद केले. सूर्यप्रकाश कमी होत असताना कर्णधार दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर दीपराज गावकरने सिली पॉईंटला नाईट वॉचमन शुभम अगरवाल याचा शानदार झेल पकडल्यामुळे छत्तीसगडला चौथा झटका बसला.
संक्षिप्त धावफलक
छत्तीसगड, पहिला डाव : 88 षटकांत 4 बाद 273 (अनुज तिवारी 86, शशांक चंद्रकार 101, आशुतोष सिंग 55, हरमीतसिंग भाटिया नाबाद 22, शुभम अगरवाल 1, अमनदीप खरे नाबाद 0, अर्जुन तेंडुलकर 12-2-34-0, लक्षय गर्ग 16-4-52-1, विजेश प्रभुदेसाई 17-2-52-2, दर्शन मिसाळ 22-2-52-1, मोहित रेडकर 17-2-65-0, दीपराज गावकर 4-0-14-0).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.