IndvsEng 1st Test : जाणून घ्या पहिल्या सामन्यातील भारताच्या पराभवाची कारणे 

IndvsEng 1st Test : जाणून घ्या पहिल्या सामन्यातील भारताच्या पराभवाची कारणे 
Copy of Gomantak Banner - 2021-02-09T164945.361.jpg

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला तब्बल 227 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यासमोर भारतीय संघ दुसऱ्या डावात 192 धावांवर सर्वबाद झाला असून, इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 - 0 ने आघाडी घेतलेली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंग मध्ये भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. तर इंग्लंडचा संघाने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. 

1 भारतीय गोलंदाजांना पहिल्या डावात इंग्लंडला रोखता आले नाही - 
ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच भूमीत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ कोरोनानंतर पहिल्यांदाच मायभूमीत इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरला होता. आणि इंग्लंड सोबत होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याचा हा निर्णय संघाने योग्य ठरवत इंग्लंडने पहिल्या डावात भारतासमोर 578 धावांचा डोंगर उभा केला. तर पहिल्या डावात फलंदाजीस उतरलेल्या डॉम सिब्ले, जो रूट आणि बेन स्टोक्स यांना भारतीय गोलंदाजांना रोखता न आल्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. 

2 भारतीय गोलंदाजांना खासकरून डॉम सिब्ले, जो रूट आणि बेन स्टोक्स यांना रोखण्यात आलेले अपयश  - 
चेन्नईची विकेट फिरकीसाठी अनुकूल असल्याने भारतीय संघाने पहिल्या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टिकाव धरत मोठी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. जो रूटने पहिल्या डावात 377 चेंडूंचा सामना करत 218 धावांची द्विशतकी खेळी साकारली. याशिवाय, डॉम सिब्ले (87) आणि बेन स्टोक्स (82) यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे इंग्लंडच्या संघाला पाचशेच्या वर धावसंख्या उभारता आली. आणि याउलट भारतीय संघाला पहिल्या डावात 337 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली. 

3 पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या तुलनेत भारत अडखळला - 
पहिल्या डावात मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात निराशाजनक झाल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर रोहित शर्माला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सपेशल अपयशी ठरले. तर, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 337 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजाराने 143 चेंडूत 73, रिषभ पंतने 88 चेंडूत 91 आणि वॉशिंग्टन सुंदरने 138 चेंडूत 85 धावा केल्या. 

4 दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी लय पकडली - 
त्यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या इंग्लंच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 178 धावांवर रोखले. भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट्स रविचंद्रन अश्विनने घेतल्या. त्याने इंग्लंडच्या सहा खेळाडूंना माघारी धाडले. तर शाहबाझ नदीमने दोन विकेट्स घेतल्या. आणि इशांत शर्मा आणि जसप्रित बुमराहने प्रत्येकी एक-एक बळी टिपले. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे टार्गेट मिळाले होते. 

5 पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावात देखील भारतीय फलंदाज ढेपाळले -
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात पुन्हा अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या रूपात भारतीय संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा चेतेश्वर पुजारा जॅक लीचचा बळी ठरला. तर अजिंक्य रहाणेला दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने खातेही खोलू दिले नाही. रिषभ पंतला देखील अँडरसनने अवघ्या अकरा धावांवर बाद केले. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर देखील झटपट बाद झाले. त्यानंतर विराट कोहलीने काही काळ मैदानावर तग धरत आपले अर्धशतक झळकावले. मात्र बेन स्टोक्सने त्याला आऊट केले. विराटने 104 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिल (50) आणि कर्णधार विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही. इंग्लंकडून जॅक लीचने सर्वाधिक चार गडी बाद केले. त्यानंतर जेम्स अँडरसनने तीन विकेट्स आणि जोफ्रा आर्चर, डॉम बेस व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवल्या.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com