INDvsENG 2nd Test : जाणून घ्या टीम इंडियाच्या विजयात कोणते ठरले टर्निग पॉईंट्स  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. आणि या विजयासोबतच टीम इंडियाने मालिकेत इंग्लंडशी बरोबरी साधली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. आणि या विजयासोबतच टीम इंडियाने मालिकेत इंग्लंडशी बरोबरी साधली आहे. कांगारूंच्या संघाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केल्यानंतर इंग्लंडसोबत चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने धमाकेदार खेळी करत दुसऱ्या सामन्यात या पराभवाची परतफेड केली. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडच्या संघाला तब्बल 317 धावांनी हरवले. या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी देखील लक्षवेधी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. 

कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचंय तर...; सौरव गांगुली यांनी सांगितला फॉर्म्युला

पहिल्या डावात फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली- 
चेन्नईतच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर भारतीय संघाची सुरवात पहिल्या डावात अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले होते. सलामीवीर शुभमन गिल फक्त शून्य धावांवर बाद झाला होता. त्याला जॅक लीचने झेलबाद केले. मात्र त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा देखील माघारी परतला. त्याच्या पाठोपाठ कर्णधार विराट कोहली देखील अवघ्या शून्य धावांवर बाद झाला. त्याला मोईन अलीने बाद केले. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने मैदानावर टिकत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. 

रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी पहिल्या डावाला आकार दिला -
यानंतर अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करत अर्धशतक लगावले. त्याने 149 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांसह 67 धावा केल्या. तो मोईन अलीचा शिकार ठरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा पाहुण्या संघाला लगावला. रिषभ पंतने 77 चेंडूंचा सामना करताना, तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने 231 चेंडूंचा सामना करताना दोन षटकार आणि 18 चौकारांच्या मदतीने 161 धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावसंख्या उभारली. 

पहिल्या डावात गोलंदाजांनी आणि खासकरून अश्विनने दमदार कामगिरी केली - 
यानंतर, पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या इंग्लंडच्या संघाला रविचंद्रन अश्विनने चांगलेच बेजार केले. इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला इशांत शर्माने अवघ्या शून्य धावांवर बाद केले. यानंतर डॉम सिब्लेला (16) अश्विनने झेलबाद केले. तर जो रूटला (6) अक्षर पटेलने माघारी धाडले. यामुळे इंग्लंडचा संघ चांगलाच अडचणीत आला. त्यानंतर पुन्हा एकदा लॉरेन्सला (9) अश्विनने बाद करून भारतीय संघाला चौथी विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ बेन स्टोक्सला (18) देखील अश्विनने माघारी धाडले. तर ओली पोपला (22) मोहम्मद सिराजने रिषभ पंत करवी झेलबाद केले. आणि त्यानंतर इंग्लंडचे उर्वरित फलंदाज झटपट बाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस अश्विनने सर्वाधिक पाच बळी टिपले. त्यामुळे पहिल्या डावात इंग्लंडचा संघ फक्त 134 धावांवर आटोपला. 

दुसऱ्या डावात अश्विनची झुंझार फलंदाजी - 
इंग्लंडचा संघ 134 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 195 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात खराब झाल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा हे लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकीय खेळी केली. त्याने 149 चेंडूंचा सामना करताना सात चौकारांसह 62 धावा केल्या. त्याला मोईन अलीने आऊट केले. त्यानंतर रिषभ पंत, अजिंक्य राहणे आणि अक्षर पटेल हे लवकर बाद झाल्यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. यावेळी अश्विनने पुन्हा एकदा झुंझार फलंदाजी करत शतकीय खेळी केली. त्याने 148 चेंडू खेळताना 106 धावा केल्या. यादरम्यान, अश्विनने एक षटकार आणि चौदा चौकार खेचले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात 286 धावांवर पोहचू शकला. आणि टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य दिले. 

भारतीय गोलंदाजांची सुवर्ण कामगिरी -
भारतीय संघाने दिलेल्या 482 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 164 धावांपर्यंतच पोहचू शकला. यावेळेस अक्षर पटेलने सर्वाधिक पाच विकेट्स मिळवल्या. तर पहिल्या डावात पाच बळी आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना पुन्हा तीन बळी टिपले. आणि कुलदीप यादवने दोन गड्यांना बाद केले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने तब्बल 317 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला.                

संबंधित बातम्या