...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर  

...म्हणून विराट कोहली भडकला होता बेन स्टोक्सवर  
INDvsENG

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा हा निर्णय चांगलाच फसल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 205 धावांवर आटोपला. टीम इंडियाचा फिरकीपटू अक्षर पटेलने गोलंदाजी करताना धमाकेदार कामगिरी केली. अक्षर पटेल सोबतच मोहम्मद सिराजने देखील दमदार गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टोला बाद केले. मात्र यावेळेस मैदानावर मोहम्मद सिराज आणि बेन स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.    

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज, इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर मोठी शाब्दिक चकमक झाली. यानंतर पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर मोहम्मद सिराजने मैदानात झालेल्या गोष्टीसंदर्भात बोलताना, बेन स्टोक्सने अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला, मात्र विराट कोहलीने मध्यस्थी करत प्रकरण व्यवस्थिपणे हाताळले असल्याचे सांगितले. खेळाच्या 12 व्या षटकातील अखेरच्या चेंडूनंतर स्टोक्सने मोहम्मद सिराजला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला होता. यावर विराट कोहली नाखूष दिसला व त्याने स्टोक्स बरोबर बोलल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांना वेगळे करण्यासाठी मैदानातीलअंपायर नितीन मेनन यांना हस्तक्षेप करावा लागला होता. 

दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा टीम इंडियाने एक गडी गमावत 24 धावा केलेल्या आहेत. भारताचा सलामीवीर शुभमन गिलला जेम अँडरसनने खातेही खोलू न देता माघारी धाडले. तर हिटमॅन रोहित शर्मा आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा 15 धावांवर खेळत आहेत. तर पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारताकडून सर्वाधिक बळी अक्षर पटेलने मिळवले आहेत. त्याने चार बळी टिपले. त्यानंतर अश्विनने तीन व मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने 14 षटके टाकताना 45 धावा देऊन दोन विकेट्स मिळवल्या.       

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com