गोव्यातील लॉकडाऊनग्रस्त क्रीडापटूंवर संशोधन

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

केरळमधील कन्नूर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल रामचंद्रन, गोव्यातील केपे सरकारी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजन मॅथ्यू आणि गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक मिल्टन फर्नांडिस यांच्याद्वारे लॉकडाऊनमधील गोव्यातील क्रीडापटूंचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

पणजी, 

कोरोना विषाणू महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे गोव्यातील क्रीडापटू, त्यांची कारकीर्द आणि क्रीडाजगत यावर भविष्यात काय परिणाम होतील याबाबत संशोधन सुरू आहे. याकामी तिघा महाविद्यालयीन प्राध्यापकांनी पुढाकार घेतला आहे.

केरळमधील कन्नूर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल रामचंद्रन, गोव्यातील केपे सरकारी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. राजन मॅथ्यू आणि गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक मिल्टन फर्नांडिस यांच्याद्वारे लॉकडाऊनमधील गोव्यातील क्रीडापटूंचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यांचा क्रीडा कारकीर्द आणि संपूर्ण क्रीडा जगतावर भविष्यात प्रतिकुल परिणाम होणार का मुख्य प्रश्न केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण होत आहे. तिघाही प्राध्यापकांनी सर्वेक्षणास सुरवात केली आहे आणि त्यांना अभिप्राय मिळू लागलेत. या सर्वेक्षणात खेळाडूंच्या आर्थिक बाबींविषयीही विचारणा करण्यात आली आहे. ``लॉकडाऊनमुळे प्रशिक्षणासाठी आणि लॉकडाऊननंतर स्पर्धांविषयी आर्थिक संकट उभे ठाकले आहे,`` असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

 मानसिकतेचा ठाव घेण्याचा प्रयत्न

तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करत होता आणि लॉकडाऊनमुळे तुमची संधी हुकली आहे का आणि त्यामुळे तुमच्या क्रीडा कारकिर्दीवर त्याचा परिणाम होईल का असे प्रश्न विचारत तिघाही क्रीडा प्राध्यापकांनी खेळाडूंच्या मानसिकतेचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आणि पूर्वीचा कामगिरी दर्जा गाठण्यासाठी किती काळ लागेल हा प्रश्नही सर्वेक्षणात विचारण्यात आला आहे.

 मानसिक ताण जाणवतो का?

लॉकडाऊन कालावधी कधी संपेल किंवा किती लांबेल याची निश्चिती नाही. या पार्श्वभूमीवर क्रीडापटूंना मानसिक ताण जाणवत आहे का अशी विचारणा तिघाची क्रीडा प्राध्यापकांनी सर्वेक्षणात केली आहे. क्रीडा लक्ष्य गाठण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं प्रेरित राखता याबाबत प्रश्न करून क्रीडापटू किती सक्षम आहे हे पाहण्यात येत आहे. ``लॉकडाऊनमुळे तुम्ही सराव करू शकत नाहीत किंवा दैनंदिनी नित्यक्रम पाळू शकत नाहीत, त्यामुळे निराश आणि उदास आहात का,`` असं क्रीडापटूंना विचारण्यात आले आहे.

संबंधित बातम्या