गोवा राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदास मुकण्याचा धोका

dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020

जीओए सूत्रानुसार, गोव्यातील स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्यास भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) अजिबात इच्छुक नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, २०२१ साली टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा होत आहे.

पणजी,

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाही, तर गोव्यासमोर यजमानपदास मुकण्याचा धोका आहे.

ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी होत असल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी गोव्यास पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याची माहिती गोवा ऑलिंपिक संघटनेच्या (जीओए) एका पदाधिकाऱ्याने दिली. ``गोव्यात ठरल्यानुसार या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन झाले नाही, तर राज्याने स्पर्धा विसरावी अशीच परिस्थिती असेल. आणखी मुदतवाढ मिळवून राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद राखणे गोव्यासाठी खूपच कठीण असेल,`` असे जीओए संबंधित क्रीडा पदाधिकाऱ्याने सांगितले.

जीओए सूत्रानुसार, गोव्यातील स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्यास भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) अजिबात इच्छुक नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, २०२१ साली टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धा होत आहे. ऑलिंपिक वर्षात खेळाडूंना आणखी दमविण्यास आयओए तयार नसेल. अपवादात्मक परिस्थितीअंतर्गत आयओएने २०२० मध्ये नियोजित असलेल्या टोकियो ऑलिंपिकनंतर राष्ट्रीय स्पर्धा घेण्यास गोव्याला परवानगी दिली होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. स्पर्धेच्या तयारीबाबत गोवा सरकारला आयओए नियमितपणे स्मरणपत्रे पाठवत आहे, त्यात आढावा घेतला जातो, तयारीबाबत सकारात्मकता असली, तरी आयओए पूर्ण समाधानी नाही.

कोरोना विषाणू महामारीमुळे टोकियोत यंदा जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिकपूर्वी या वर्षी ठरल्यानुसार २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्यास भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक तयारीची सुवर्णसंधी लाभेल, असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना वाटते. यासंदर्भात त्यांनी एप्रिल महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रीय क्रीडा महासंघास (एनएसएफ) लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.

 

कामे पूर्ण करण्याचे आव्हान

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोव्यास वारंवार मुदतवाढ मिळूनही अजून तयारी पूर्ण झालेली नाही. स्पर्धा तांत्रिक संयोजन समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार यांना पाठविलेल्या पत्रात सर्व तयारी ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई यांनी दिले आहे. काही ठिकाणी कामे सुरू आहे, पण कोविड-१९ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वेग खूपच संथ आहे. त्यानंतर पावसाळा सुरू होणार असल्याने आयओएने राज्य प्रशासनास पाठविलेल्या स्मरणपत्रात चिंता व्यक्त केली आहे. कामाचा वेग वाढवून या वर्षीच स्पर्धा ठरल्यानुसार घ्यावी अशी सूचना आयओएचे सचिव राजीव मेहता यांनी राज्य प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात केली आहे.

 

संबंधित बातम्या