रोहितसह पाच जणांची खेल रत्नसाठी शिफारस

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, आघाडीची महिला कुस्तीगीर विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, रिओ पॅराऑलिंपिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलू आणि महिला हॉकी कर्णधार रानी रामपाल यांची शिफारस खेल रत्नसाठी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: रिओ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रभावी कामगिरी केल्यानंतर चार खेळाडूंचा खेल रत्नने सन्मान करण्यात आला होता. आता चार वर्षांनी ऑलिंपिक रद्द होत असतानाच रोहित शर्मासह पाच खेळाडूंची खेल रत्नसाठी शिफारस करण्यात आली.

स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, आघाडीची महिला कुस्तीगीर विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, रिओ पॅराऑलिंपिक सुवर्णपदक विजेता मरिअप्पन थंगावेलू आणि महिला हॉकी कर्णधार रानी रामपाल यांची शिफारस खेल रत्नसाठी करण्यात आली आहे. २०१६ च्या रिओ ऑलिंपिकनंतर पी. व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, नेमबाज जितू राय आणि कुस्तीगीर साक्षी मलिक या चौघांना खेल रत्न देण्यात आले होते. हीच पुनरावृत्ती यंदा घडली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल रोहितची शिफारस झाली आहे, तर दोन वर्षांपूर्वीच्या राष्ट्रकुल, तसेच आशियाई क्रीडा सुवर्णपदकामुळे विनेश पात्र ठरली आहे. मनिकाने दोन वर्षापूर्वीचे राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा गौरव झाला आहे. रिओ पॅराऑलिंपिक सुवर्णपदकानंतरही थंगावेलू याला चार वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे.

पुरस्कारासाठी शिफारस
द्रोणाचार्य पुरस्कार, जीवनगौरव: धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरषोत्तम राय (ॲथलेटिक्‍स), शिव सिंग (बॉक्‍सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), के के हुडा (कबड्डी), विजय मुनीश्‍वर (पॅरा - पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस), ओ पी दहिया (कुस्ती). नियमित ः योगेश मालविया (मल्लखांब), गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप हांडू (वुशू), ज्यूद फेलिक्‍स (हॉकी).

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार: जिन्सी फिलिप्स (ॲथलेटिक्‍स), कुलदीप सिंग भुल्लर (ॲथलेटिक्‍स), तृप्ती मुरगुंडे, प्रदीप गंधे (दोघेही बॅडमिंटन), एन. उषा, लखा सिंग (दोन्ही बॉक्‍सिंग), सुखविंदर सिंग संधू (फुटबॉल), अजित सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (कबड्डी), मनजीत सिंग (रोईंग), सचिन नाग (जलतरण), नंदन बाळ (टेनिस), नेतार पाल हुडा (कुस्ती), रणजीत कुमार (पॅरा ॲथलेटिक्‍स).

निकष बाजूला
केंद्र सरकारच्या पुरस्कार निकष नियमावलीनुसार निवड समिती तिघांची ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी, तसेच पाच जणांची द्रोणाचार्य मार्गदर्शक पुरस्कारासाठी सूचना करण्यास सांगितले होते, पण या निकषाचे समितीने पालन केलेले नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या