रोहित म्हणतोय.. मी पूर्णपणे तंदुरुस्त !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

तंदुरुस्त नसल्यामुळे एका आठवड्यापूर्वी रोहित शर्माला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या वादावर थेट टिप्पणी करणे टाळलेल्या रोहित शर्माने आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले.

मुंबई/ दिल्ली/ दुबई : तंदुरुस्त नसल्यामुळे एका आठवड्यापूर्वी रोहित शर्माला भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर सुरू झालेल्या वादावर थेट टिप्पणी करणे टाळलेल्या रोहित शर्माने आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले. भारतीय मार्गदर्शक रवी शास्त्री आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली ब्रेक घेण्याची सूचना करीत असताना रोहितने आपण आयपीएलमध्ये खेळतच राहणार असल्याचेही सांगितले.

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स लढतीतील निकाल मुंबईसाठी महत्त्वाचा नव्हता; मात्र रोहित शर्मा खेळल्याने त्या लढतीची चर्चा झाली. भारतीय मंडळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोटरीची दुखापत होते, त्या वेळी चोरटी एकेरी धाव घेणे तसेच दोन धावा घेताना किती त्रास होतो हे महत्त्वाचे असते. रोहितने आपल्या छोट्याशा खेळीत हे दोन्ही करून दाखवले.

सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी तंदुरुस्तीबाबतच्या प्रश्‍नास उत्तर देण्यापूर्वी रोहितने स्मितहास्य केले आणि सर्व काही ठिक आहे असे सांगितले. सामन्यानंतर तर रोहितने सर्व काही उत्तम आहे असे पुन्हा हसतच सांगितले. मैदानावर पुन्हा उतरलो याचा आनंद आहे. काहीशा खडतर परिस्थितीतून जात होतो, पण मैदानात परतलो आहे. अजूनही काही सामने खेळण्याचा विचार आहे, त्यानंतर बघू काय होते. मैदानावर राहून खेळत राहणे मला आवडते, असे त्याने सांगितले.

मार्गदर्शकांना दुखापतीबाबतमाहिती नाही, विश्‍वासच नाही

भारतीय संघाचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांना रोहितच्या दुखापतीबाबत नेमकी काहीही माहिती नाही यावर विश्‍वास कसा ठेवणार, अशी विचारणा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केली. आपण निवड समितीत नसल्याने रोहितच्या निर्णयात आपला सहभाग नव्हता असे शास्त्री यांनी सांगितले होते.

शास्त्री निवड समितीत नसले तरी निवड समितीने रोहितबाबत निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याशी नक्कीच चर्चा केली असेल. संघनिवडीपूर्वी निवड समिती सदस्य तसेच कर्णधार आणि मार्गदर्शकांत संघातील खेळाडूंबाबत चर्चा होतच असते. कर्णधार, मार्गदर्शकांच्या मतास महत्त्व असते, असे सेहवाग म्हणाला.फ्रॅंचाईजकडून खेळण्यास तयार असलेल्या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड होत नाही, हे धक्कादायक आहे असे सेहवाग म्हणतो.

"आता खरा प्रश्‍न हा आहे, की रोहितसाठी आयपीएल महत्त्वाची आहे की भारतासाठी खेळणे? त्याच्यासाठी देशाकडून खेळण्यापेक्षा क्‍लब महत्त्वाचा आहे का? भारतीय मंडळ याबाबत काही निर्णय घेणार का? याचबरोबर भारतीय मंडळाच्या फिझिओंनी रोहितच्या दुखापतीचे योग्य आकलन केले नाही का हेही बघण्याची गरज आहे."
- दिलीप वेंगसरकर

संबंधित बातम्या