ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होतोय‘फिट अँड फाईन’

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

माझ्या हॅमस्ट्रिंगची (मांडीच्या स्नायूची दुखापत) बरीच चर्चा झाली; पण दुखापतीचे नेमके स्वरूप मला माहीत होते. ती गंभीर नव्हती, याचीही जाणीव होती. आता यातून पूर्णपणे बरा होत असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यास सज्ज होत आहे, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.

नवी दिल्ली : माझ्या हॅमस्ट्रिंगची (मांडीच्या स्नायूची दुखापत) बरीच चर्चा झाली; पण दुखापतीचे नेमके स्वरूप मला माहीत होते. ती गंभीर नव्हती, याचीही जाणीव होती. आता यातून पूर्णपणे बरा होत असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यास सज्ज होत आहे, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.

रोहित शर्मा सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीचा अभ्यास करत आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात असताना त्याला झालेल्या या दुखापतीवरून जोरदार तर्क-वितर्क करण्यात आले. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून वगळण्यातही आले आहे. ही दुखापत नेमक्‍या कोणत्या स्वरूपाची आहे आणि तंदुरुस्तीत आता किती प्रगती झाली आहे, याबाबत रोहितनेच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्टीकरण दिले. 

माझ्या दुखापतीबाबत नेमकी कोणत्या प्रकारची चर्चा सुरू होती, हे मलाच कळत नव्हते; पण त्या वेळी मी मुंबई इंडियन्स आणि बीसीसीआय यांच्याशी सातत्याने चर्चा करून त्यांना माहिती देत होतो, असे रोहितने सांगितले. अंतिम सामन्यात रोहितने मॅचविनिंग ५० चेंडूंत ६८ धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सला विजेतेपदही मिळवून दिले.

मांडीचे दुखावलेले स्नायू आता पूर्वपदावर येत आहेत. या स्नायूंत बळकटी येण्यास सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेत खेळण्यापूर्वी पूर्ण बरा झालेलो असेन. कोणताही किंतू मागे राहू नये म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आलो आहे, असेही रोहितने स्पष्ट केले.

...म्हणून धोका पत्करला नाही
आयपीएल झाल्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर काही उपचार करणे आवश्‍यक होते. म्हणून मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गेलो नाही. कारण या मालिकेतील काही सामने सगल दोन दिवसांनी होणार आहेत. जवळपास १२ दिवसांत सहा सामने खेळायचे आहेत, म्हणून मी धोका पत्करला नाही. अजून काही दिवस विश्रांती आणि उपचार घेतले, तर कसोटी मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्याचा विश्वास होता, असे रोहितने सांगितले.

टीकाकारांकडे लक्ष दिले नाही
दुखापत पूर्ण बरी झालेली नसतानाही मी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळलो; परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे मला कोण काय बोलतोय किंवा मी ऑस्ट्रेलियाला जाईन की नाही, याबाबत तर्क-वितर्क करत होते, त्याची मला चिंता नव्हती, असे स्पष्ट मत रोहितने मांडले. दुखापत झाल्यानंतर मी स्वतःच आढावा घेतला. पुढच्या दिवसांत आपण खेळू शकणार की नाही, याचा विचार केला. जोपर्यंत मैदानावर जात नाही, तोपर्यंत आपण किती तंदुरुस्त होत आहोत, याची कल्पना येत नसते, असे सांगून रोहित म्हणाला, प्रत्येक दिवशी या दुखापतीच्या स्वरूपात बदल होत होता; पण ज्या प्रकारे मी प्रतिसाद देत होतो, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. प्लेऑफपूर्वी आपण एखादा सामना खेळू शकतो, हे मी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला सांगितले होते आणि त्यामुळे खेळलोही.

संबंधित बातम्या