रोमियोस पुन्हा एफसी गोवाची ओढ

Dainik Gomantak
सोमवार, 29 जून 2020

गतमोसमात ओडिशा एफसीकडून खेळलेला विंगर सध्या करारमुक्त

पणजी

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिले तीन मोसम एफसी गोवाकडून खेळलेला रोमियो फर्नांडिस याला पुन्हा आपल्या मूळ संघाची ओढ लागली आहे. ओडिशा एफसीबरोबरचा त्याचा करार ३१ मे रोजी संपला असून सध्या तो करारमुक्त खेळाडू आहे.

एफसी गोवाचे नवे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या पसंतीत उतरल्यास हा २७ वर्षीय विंगर आगामी मोसमात एफसी गोवाच्या जर्सीत दिसू शकतो. रोमियो गतमोसमात जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसी संघातून तीन सामन्यांत मिळून फक्त ६५ मिनिटेच खेळला. गेल्या वर्षी २२ डिसेंबरनंतर रोमियो स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेला नाही.

एफसी गोवाकडून २०१४, २०१५, २०१६ असे तीन मोसम खेळल्यानंतर रोमियो २०१७ साली दिल्ली डायनॅमोज संघात रुजू झाला होता. २०१७-१८ व २०१८-१९ असे दोन मोसम त्याने या संघाचे प्रतिनिधित्व केले, पण गतमोसमात दिल्लीचा संघाने भुवनेश्वर येथे बाडबिस्तारा हलविल्यानंतर रोमियोला क्वचितच संधी मिळाली.

धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे प्रकाशझोतात आलेल्या रोमियोची एफसी गोवा संघात मंदार राव देसाई याच्यासमवेत चांगली जोडी जमली होती. एफसी गोवा संघाचे तेव्हाचे प्रशिक्षक माजी ब्राझीलियन स्टार झिको यांनीही रोमियोची प्रशंसा केली होती. त्यामुळे ब्राझीलमधील अव्वल साखळीत खेळणाऱ्या एटलेटिको परानेन्ज क्लबने त्याला करारबद्ध केले, पण हा करार जास्त लांबला नाही. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी करारपत्र सही केल्यानंतर २५ मे २०१५ रोजी परानेन्ज क्लबने रोमियोला मुक्त करत असल्याचे जाहीर केले. या कालावधीत तो सीनियर पातळीवर फक्त एकच सामना खेळला, त्यामुळे दक्षिण अमेरिकेत व्यावसायिक फुटबॉल सामना खेळलेला पहिला भारतीय फुटबॉलपटू हा मान रोमियोच्या नावे नोंदीत झाला.

 आयएसएल स्पर्धेत रोमियो फर्नांडिस

- एकूण ६३ सामने, ८ गोल, ७ असिस्ट

- एफसी गोवा (२०१४-२०१६) ३७ सामने, ७ गोल, ४ असिस्ट

- दिल्ली डायनॅमोज (२०१७-१८ – २०१८-१९) २३ सामने, १ गोल, ३ असिस्ट

- ओडिशा एफसी (२०१९-२०) ३ सामने

संबंधित बातम्या