रोमियो गतमोसमात खेळला फक्त ६५ मिनिटे!

किशोर पेटकर
सोमवार, 18 मे 2020

दिल्ली डायनॅमोज-ओडिशा एफसी संघाच्या व्यवस्थापनाने त्याच्याशी २३ जुलै २०१७ रोजी करार केला होता. हा करार येत्या ३१ मे रोजी संपत आहे.

पणजी,

गोमंतकीय विंगर रोमियो फर्नांडिस याच्यासाठी २०१९-२० मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा विसरण्याजोगी ठरली. संपूर्ण मोसमात तो फक्त ६५ मिनिटेच मैदानावर दिला. काही वर्षांपूर्वी थेट ब्राझीलमध्ये खेळलेल्या या २७ वर्षीय फुटबॉलच्या कारकिर्दीस उतरती कळा लागल्याचे दिसले.

रोमियो २०१७ पासून दिल्ली डायनॅमोज संघातून खेळत आहे. गतमोसमात या संघाचे नामकरण ओडिशा एफसी झाले व भुवनेश्वर मुख्यालय बनले. ओडिशा एफसी संघातर्फे रोमियो गतमोसमात फक्त तीनच सामने खेळला. मुंबई सिटीविरुद्ध २२ मिनिटे, एटीके एफसीविरुद्ध ३ मिनिटे, तर एफसी गोवाविरुद्ध फातोर्डा येथे ४० मिनिटे तो खेळला. ओडिशाच्या १८ पैकी १२ सामन्यांसाठी तो संघातही नव्हता, तर तीन सामने बेंचवर होता. गेल्या वर्षी २२ डिसेंबरनंतर रोमियो एकही स्पर्धात्मक फुटबॉल सामना खेळलेला नाही.

दिल्ली डायनॅमोज-ओडिशा एफसी संघाच्या व्यवस्थापनाने त्याच्याशी २३ जुलै २०१७ रोजी करार केला होता. हा करार येत्या ३१ मे रोजी संपत आहे. दिल्ली डायनॅमोजकडून २०१७-१८ मोसमातील १२ सामन्यांत ८३० मिनिटे, तर २०१८-१९ मोसमातील ११ सामन्यांत  ४३७ मिनिटे खेळलेला रोमियो गतमोसमात मैदानाबाहेरच जास्त राहिला.

धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे प्रकाशझोतात आलेला रोमियो २०१४ ते २०१६ पर्यंतच्या आयएसएल स्पर्धेत स्पर्धेत एफसी गोवाचा मुख्य खेळाडू होता. मंदार राव देसाई याच्यासमवेत त्याची चांगली जोडी जमली होती. एफसी गोवा संघाचे तेव्हाचे प्रशिक्षक माजी ब्राझीलियन स्टार झिको यांनीही रोमियोची प्रशंसा केली होती. त्यामुळे ब्राझीलमधील अव्वल साखळीत खेळणाऱ्या एटलेटिको परानेन्ज क्लबने त्याला धेंपो क्लबकडून २०१५ मध्ये लोनवर करारबद्ध केले, पण हा करार जास्त लांबला नाही. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी करारपत्र सही केल्यानंतर २५ मे २०१५ रोजी परानेन्ज क्लबने रोमियोला मुक्त करत असल्याचे जाहीर केले. या कालावधीत तो सीनियर पातळीवर फक्त एकच सामना खेळला, त्यामुळे दक्षिण अमेरिकेत व्यावसायिक फुटबॉल सामना खेळलेला पहिला भारतीय फुटबॉलपटू हा मान रोमियोच्या नावे नोंदीत झाला. नोव्हेंबर २०१५ मध्ये गुआमविरुद्ध त्याने भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्या एका सामन्यानंतर तो पुन्हा भारताच्या राष्ट्रीय संघात दिसला नाही.

 

आयएसएल स्पर्धेत रोमियो फर्नांडिस

- एकूण ६३ सामने, ८ गोल, ७ असिस्ट

- एफसी गोवा (२०१४-२०१६) ३७ सामने, ७ गोल, ४ असिस्ट

- दिल्ली डायनॅमोज (२०१७-१८ – २०१८-१९) २३ सामने, १ गोल, ३ असिस्ट

- ओडिशा एफसी (२०१९-२०) ३ सामने

संबंधित बातम्या