आयएसएल २०२०: रॉविल्सन गोकुळम केरळाच्या जर्सीत

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

व्यावसायिक कारकिर्दीत विविध क्लबकडून खेळताना रॉविल्सनने दोन वेळा आय-लीग विजेतेपद, तसेच ड्युरँड कप, आयएफए शिल्ड आदी स्पर्धा जिंकली आहे. तो यापूर्वी आय-लीग, तसेच आयएसएल स्पर्धेत खेळला आहे. 

पणजी: गोव्याचा अनुभवी फुटबॉलपटू रॉविल्सन रॉड्रिग्ज आगामी आय-लीग स्पर्धेत गोकुळम केरळा एफसी जर्सीत खेळताना दिसेल. या संघाने शुक्रवारी ३३ वर्षीय बचावपटूच्या करारावर शिक्कामोर्तब केले.

व्यावसायिक कारकिर्दीत विविध क्लबकडून खेळताना रॉविल्सनने दोन वेळा आय-लीग विजेतेपद, तसेच ड्युरँड कप, आयएफए शिल्ड आदी स्पर्धा जिंकली आहे. तो यापूर्वी आय-लीग, तसेच आयएसएल स्पर्धेत खेळला आहे. 

सेझा फुटबॉल अकादमीतून प्रशिक्षित झाल्यानंतर रॉविल्सन चर्चिल ब्रदर्स संघात दाखल झाला. तो संघात असताना रेड मशिन्स संघ २००७ साली ड्युरँड कप विजेता ठरला होता. चर्चिल ब्रदर्स संघातून खेळताना रॉविल्सन २००८-०९ मोसमात आय-लीग विजेतेपदाचा मानकरी ठरला. रॉविल्सनने २०१० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. २०११ साली तो धेंपो स्पोर्टस क्लब संघात दाखल झाला. या संघातून खेळताना तो २०११-१२ मोसमात आय-लीग करंडक विजेता ठरला. 

रॉविल्सनने नंतर कोलकात्यातील मोहन बागान, आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा, मुंबई सिटी एफसी, तसेच दिल्ली डायनॅमोज आदी संघांचे प्रतिनिधित्व केले. मागील दोन वर्षे तो चर्चिल ब्रदर्स संघाशी करारबद्ध होता, पण गेले वर्षभर दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहिला, मात्र आता तो तंदुरुस्त असून गोकुळम केरळाकडून खेळण्यास सज्ज झालेला आहे. आगामी मोसमात आपल्या अनुभव आणि क्षमतेचा लाभ गोकुळम केरळा संघाला करून देण्याचा मनोदय रॉविल्सनने व्यक्त केला आहे. या संघातर्फे आय-लीग जिंकण्याचे त्याचे लक्ष्य आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या