आयएसएल २०२०: कृष्णा-विल्यम्स जोडी पुन्हा एकत्रित; गोव्यात गोलधडाका अपेक्षित

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

गोव्यात येत्या नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सातव्या आयएसएल स्पर्धेत ते पुन्हा एकाच संघातून खेळत असून या जोडगोळीकडून गोलधडाका अपेक्षित असेल.

पणजी: गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या एटीके संघाच्या यशात फिजी देशाचा रॉय कृष्णा व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड विल्यम्स जोडीने एकत्रित २२ गोल केले होते. गोव्यात येत्या नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सातव्या आयएसएल स्पर्धेत ते पुन्हा एकाच संघातून खेळत असून या जोडगोळीकडून गोलधडाका अपेक्षित असेल.

एटीके-मोहन बागानने रॉय कृष्णा याच्याशी जूनमध्ये करार केला होता, गतमोसमात तो एटीके संघाचा कर्णधारही होता. आता विल्यम्स यालाही २०२०-२१ मोसमासाठी संघात घेतले आहे. कोलकात्यातील या संघासाठी कृष्णा व विल्यम्स यांची कामगिरी निर्णायक असेल. गतमोसमात (२०१९-२०) एटीकेच्या यशात कृष्णा याने २१ सामन्यांत १५ गोल व ६ असिस्ट, तर विल्यम्सने ७ गोल व ५ असिस्ट अशी प्रभावी कामगिरी नोंदीत केली होती. कृष्णा ३३ वर्षांचा असून फिजी देशाचा आंतरराष्ट्रीय स्ट्रायकर आहे. ३२ वर्षीय विल्यम्सपाशी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, तसेच युरोपात लीग खेळण्याचा अनुभव आहे. 

न्यूझीलंडमधील लीग स्पर्धेत वेलिंग्टन फिनिक्स संघाकडून खेळताना कृष्णा व विल्यम्स यांची जोडी जमली. गतमोसमात त्यांनी भारतीय मैदानावर धडाकेबाज खेळ केला. या वर्षी १४ मार्च रोजी सहाव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना गोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बंद दरवाज्याआड एटीके व चेन्नईयीन एफसी यांच्यात झाला होता. स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेने स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली होती. त्यावेळी कृष्णा व विल्यम्स यांनी गोल नोंदविले नव्हते, पण हावी हर्नांडेझचे दोन व एदू गार्सियाचा एक गोल यामुळे एटीकेचे विजेतेपद साकारले होते. त्यापैकी एक गोल कृष्णाच्या असिस्टवर होता. 

गोव्यात गोलची प्रतीक्षा
एटीके संघ २०१९-२० मोसमात गोव्यात दोन सामने खेळला. चेन्नईयीनविरुद्धची अंतिम लढत वगळता, एफसी गोवा आणि एटीके यांच्यात १४ डिसेंबर २०१९ रोजी फातोर्ड्यात सामना झाला होता, त्यावेळी एफसी गोवाने २-१ फरकाने विजय नोंदविला. एटीकेचा एकमात्र गोल जॉबी जस्टीन याने केला होता. आगामी आयएसएल स्पर्धेत एटीके-मोहन बागानसाठी फातोर्ड्यातील स्टेडियम होम ग्राऊंड असेल, त्यामुळे कृष्णा व विल्यम्स जोडीस या मैदानावर गोल नोंदविण्याची संधी राहील.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या